हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। खूप मोठ्या गॅपनंतर मराठी अभिनेता संतोष जुवेकरने एका मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनोरंजन केले आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘३६ गुण’. हा चित्रपट अलीकडेच ४ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाला. यावेळी आपला चित्रपट पाहण्यासाठी संतोष आपल्या वडिलांना घेऊन चित्रपट पहायला गेला होता. यानंतर त्याने आपल्या बाबांची प्रतिक्रिया आपल्या चाहत्यांसह शेअर करताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अभिनेता संतोष जुवेकरने हि पोस्ट त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. हि एक व्हिडीओ पोस्ट असून यासोबत त्याने एक कॅप्शनही लिहिले आहे. या पोस्टमध्ये संतोष जुवेकर म्हणतो कि, ‘माझ्या बाबांनी “झेंडा”, “मोरया” आणि “एक तारा” हे माझे चित्रपट माझ्यासोबत थेटरमध्ये पाहिले आणि आज माझा ‘३६ गुण’ हा सिनेमा माझ्यासोबत त्यांनी थेटरमध्ये पाहिला जवळजवळ सात आठ वर्षांनी. 36 गुण हा सिनेमा बघून त्यांना काय वाटलं हे त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलय..’
या व्हिडिओमध्ये संतोष जुवेकरचे बाबा दिसत आहेत. आपल्या मुलाचा ‘३६ गुण’ हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले कि, ‘हल्लीची मुलं ऑनलाइन माध्यमातून आपलं लग्न जमवतात. तर काहीजण पत्रिका पाहून.. पण मनं जुळणं महत्वाचं आहे, एकमेकांवर विश्वास हवा. विश्वासावर जग चाललंय. त्यामुळे आपल्या जीवनसाथीवर तो हवाच. शिवाय जोवर तुमचे विचार जुळत नाही तोवर पत्रिका जुळूनही काही उपयोग नाही.’ अशी अतिशय विचारपूर्वक प्रतिक्रिया संतोषच्या बाबांनी दिली आहे. संतोषचा ‘३६ गुण’ हा चित्रपट आजच्या तरुण युगलांवर आधारित आहे. पत्रिका जुळूनही संसारात अडचणी येणे आणि त्या दांपत्याचे आयुष्य उथल पुथल होणे यावर हा चित्रपट भाष्य करतो.
Discussion about this post