हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीवर ६० वर्षाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी २ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी ३ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी अडीच वाजता पारसी वाडा, विलेपार्ले पूर्व येथे रमेश देव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले आणि चित्रपटसृष्टीतील आणखी एक उमदा तारा निखळला. यानंतर चित्रपट सृष्टी शोकाकुल झाली. मात्र दुःखाचा डोंगर कोसळला तो देव कुटुंबावर. रमेश देव यांच्या पश्चात पत्नी – अभिनेत्री सीमा देव, पुत्र – अभिनेता अजिंक्य देव, पुत्र – दिग्दर्शक अभिनय देव तसेच नातवंडे आर्य देव, तान्या देव असा परिवार आहे. दरम्यान चिरंजीव अजिंक्य देव यांनी व्यक्त होताना वडिलांच्या आठवणी सांगितल्या. दरम्यान ते खूप भावुक झाल्याचे दिसून आले.
दिवंगत अभिनेता रमेश देव यांचे चिरंजीव आणि अभिनेता अजिंक्य देव म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून बाबांना खोकला, कफ झाला होता. बुधवारी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. सायंकाळपर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. तेव्हा त्यांची प्रकृती ठीक असल्याने डॉक्टरांशी बोलून त्यांना गुरुवारी विशेष विभागात स्थलांतरित करायचे ठरवले. हे त्यांना सांगितल्यावर ते आनंदी झाले. बराच वेळ त्यांनी माझ्याशी व अभिनयशी गप्पा मारल्या. आम्हा दोघांनाही आपल्या डोक्यावरून हात फिरवायला सांगितला. आम्ही डोक्यावरून हात फिरवताच त्यांनी सुखाचा उसासा घेतला. त्यामुळे काही अघटित घडेल, असे ध्यानीमनी नव्हते.
पुढे सांगितले की, ३० जानेवारीला बाबांचा ९३’वा वाढदिवस झाला. त्यानंतर ते एका कार्यक्रमाला गेले होते. तिथे त्यांनी सगळ्यांना सांगितले की, मी जेव्हा १०० वर्षांचा होईन, तेव्हा पुन्हा इथे येईन. ही त्यांची जिद्द, आयुष्याकडे पाहण्याची सकारात्मकता, ऊर्जा, प्रेरणादायी होती. दुर्दैवाने त्यांची १०० वर्षे जगण्याची इच्छा अपुरीच राहिली. बुधवारी सकाळी रुग्णालयात दाखल केल्यानंतर ते माझ्याशी हसत हसत म्हणाले, अजिंक्य तू मला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलास. मला खूप आनंद झाला. कारण मी आता जाणार आहे. त्यांचे हे बोल ऐकून आमच्या मनात चर्र झाले. आम्ही त्यांना म्हणालो, बाबा तुम्ही असे काही बोलू नका, असा विचार करू नका. तुम्हाला आमच्यासाठी जगायचे आहे. त्यावर ते म्हणाले, ‘अरे आयुष्यभर मी सगळ्यांचे सगळे केले, यापुढे माझ्यासाठी करायचे आहे’. अखेर त्यांचे हे बोल खरे ठरले.
Discussion about this post