हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट येत्या ७ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेते सयाजी शिंदे, नागराज मंजुळे, आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत. सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे अभिनेता आकाश ठोसरने मात्र सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना लग्नाचे आमंत्रण देत लग्नपत्रिकासुद्धा शेअर केली आहे.
नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ चित्रपटामूळे परश्या आणि आर्ची या जोडीला प्रेक्षकांनी तुफान पसंती दिली होती. अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांनी लग्न करावं अशी ईच्छा अनेकदा चाहते व्यक्त करतात. असे असताना आकाश मात्र लग्न ठरवून मोकळा झाला. ठरवून काय तर येत्या १० दिवसात तो बोहल्यावर चढणार आहे. काही तासांपूर्वी आकाश ठोसरने मुंडावळ्या बांधून नवरदेवाच्या लूकमधला फोटो शेअर केल्याने सगळ्यांची धडधड वाढली होती. यानंतर आज त्याने ‘आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.. यायचं बर का…१० दिवस..’ असे कॅप्शन देत होणाऱ्या बायकोसोबतचा फोटो शेअर केला आहे.
आकाश ठोसर दुसरं तिसरं कुणी नाही तर अभिनेत्री सायली पाटीलसोबत लग्नगाठ बांधतोय. होय. पण खरंच तुम्ही समजताय तसं हे लग्न नाहीये. म्हणजेच या व्हायरल होणाऱ्या फोटोसोबत जोडलेली लग्न पत्रिका पाहिलात तर समजेल कि, आकाश आणि सायली नाही तर राजू आणि लक्ष्मी यांचं लग्न आहे. राजू आणि लक्ष्मी हि ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटातील पात्र आहेत आणि हे फोटोसुद्धा प्रोमोशनचाच एक भाग आहेत.
असे असले तरीही सोशल मीडियावर मात्र या फोटोंची भारी चर्चा सुरु आहे. अनेकांनी ‘आर्चीला दगा दिला’ म्हणत परश्याची म्हणजेच आकाशची शाळा घेतली आहे. ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटात आकाश ठोसर आणि सायली पाटील यांची फ्रेश जोडी आपल्या भेटीला येणार आहे.
Discussion about this post