हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून बॉलिवूडपेक्षा मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या कलाकारांना मराठी सिनेसृष्टीत लहान का होईना पण एखादं काम करण्याची कळ असल्याचे वारंवार दिसले आहे. सलमान खान, डेझी शाह यांच्यानंतर आता बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याने मराठीत ग्रँड एंट्री घेतली आहे. भाग्य थोर म्हणून त्याला पहिल्याच ब्रेकमध्ये महाराष्ट्राचे आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.
लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार शिवरायांची आव्हानात्मक भूमिका साकारणार आहे. या मल्टीस्टारर चित्रपटात कोणकोणते कलाकार कोणकोणती भूमिका साकारणार हे बुधवारी एका शानदार सोहळ्यात सर्वांसमोर आणलं गेलं. या चित्रपटात विराज मडके हा जीवाजी पाटील यांची भूमिका साकारत आहे. तर सत्या मांजरेकर हे दत्ताची पागे यांची भूमिका साकारणार आहेत. तसेच हार्दिक जोशी हा मल्हारी लोखंडे यांची भूमिका साकारतोय आणि जय दुधाणे हा तुळजा जामकर यांची भूमिका साकारतोय. यासह विशाल निकम हा चंद्राजी कोठार यांची भूमिका तर उत्कर्ष शिंदे हा सूर्याजी यांची भूमिका साकारतोय. याशिवाय प्रवीण तरडे हे प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हा चित्रपट अत्यंत भव्य असणार आहे. यातील स्टार कास्ट एव्हढी तगडी असल्यामुळे अपेक्षाही फार आहेत. हा चित्रपट केवळ मराठी नव्हे तर तेलुगू आणि हिंदी भाषांमध्येदेखील सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमाचा बुधवारी शुभारंभ झाला आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंच्या हस्ते क्लॅप देऊन चित्रपटासाठी शुभारंभ करण्यात आला.
Discussion about this post