हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अर्थात अक्षय कुमार याचा बहुचर्चित चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’ प्रदर्शित तर झाला पण त्याची काही जादू चालली नाही. याचा प्रत्यय नुकताच थिएटर चालकांना आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि प्रमोशन पाहता ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भारीच धमाल करेल असे वाटले होते. पण प्रत्यक्षात मात्र काही भलतंच घडल्याचं दिसतंय. अक्षयच्या चित्रपटाने प्रेक्षकांचा असा अपेक्षाभंग केलाय कि आता चाहत्यांनाही चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आलाय. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाचे शो प्रेक्षक नसल्यामुळे चक्क रद्द करण्यात आले आहेत. आतापर्यंत अक्षयच्या कारकिर्दीतला हा मोठा धक्का म्हणावं लागेल.
ई टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर अभिनित ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट 3 जून 2022 रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये प्रेक्षक येत नाहीत असे अनेक ठिकाणी दिसून आले. शेवटी पर्याय नसल्यामुळे काही ठिकाणाचे शो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्य म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच शोला प्रेक्षकांची गर्दी नाही हे दिसून येत होते. मात्र आता बरेच शो रद्द करण्याची वेळ या चित्रपटावर यावी हि अत्यंत वाईट बाब आहे.
मोठं बजेट, भव्य दिव्य सेट, तगडी स्टार कास्ट, जबरदस्त प्रमोशन एव्हढं करुनही अक्षयच्या या चित्रपटाला कमाईच्या बाबतीत निराशा हाती आली आहे. हा निर्मात्यांसाठी जबरदस्त फटका असून दिग्दर्शकासह अगदी कलाकारांसाठीही निराशेची बाब आहे. मुख्य म्हणजे, अभिनेत्री मानुषी छिल्लरचा हा पहिलाच चित्रपट होता आणि तो बॉक्स ऑफिसवर अशा पद्धतीने आदळला आहे हि बाब तिच्यासाठीही निराशा आणणारी आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने फक्त 11 कोटी रुपये कमावले होते. तर विकेंड असूनही चित्रपटाची कमाई फारशी झाली नाही. आतापर्यंत केवळ 48.60 कोटी या चित्रपटाने कमाई केल्याचे दिसून आले आहे.
Discussion about this post