हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशभरात पसरलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम झाला आहे. इतकेच नव्हे तर याचा परिणाम थेट फिल्म इंडस्ट्रीजवरदेखील झाला आहे. अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी थिएटर बंद असणे हा मुख्य अडथळा आजही कायम आहे. परिणामी अनेक निर्मात्यांनी आपला मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळविला आहे. आता अक्षय कुमारचा “बेलबॉटम” हा चित्रपट सुद्धा लवकरच ओटीटी वर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. ‘बेलबॉटम’ हा चित्रपट कन्नड चित्रपटाचा रिमेक असून या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या वर्षभरापासून कोणताही नवीन चित्रपट प्रदर्शित होऊ शकलेला नाही. तर अनेक चित्रपटांचे शूटिंग रखडले आहे. बहुतेक चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख देखील पुढे ढकलली गेली आहे. दरम्यान काही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याची घोषणा केली जाऊ लागली आहे. अलीकडेच सलमान खानचा ‘राधे’ आणि कंगना रणावतचा ‘थलायवी’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’ या चित्रपटाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याची तयारी सुरू झाली आहे.
‘बेलबॉटम’ २८ मे २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, सध्याच्या घडीला देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे वातावरण पाहता ही परिस्थिती लवकर सुधारेल आणि ‘बेल बॉटम’ थिएटरमध्ये प्रदर्शित होईल असे काही वाटत नाही. त्यामुळे निर्मात्यांनी अमेझॉन प्राईम आणि हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मशी चर्चा सुरू केली आहे. सिनेमाचे हक्क विकायला या दोघांपैकी जो अधिक पैसे देईल, त्याला पसंती दिली जाईल. या दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये सध्या ‘बेलबॉटम’च्या अधिकारांवरून रस्सीखेच आहे.
Discussion about this post