हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। उद्या दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट ‘चंद्रमुखी’ प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रमुखी चित्रपटातील कलाकार आणि गाण्यांची सर्वत्र चर्चा रंगली आहे. विश्वास पाटील लिखित चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक याने केले असून यातील मुख्य भूमिकेत अमृता खानविलकर दिसून येत आहे. त्यामुळे अत्र तत्र सर्वत्र फक्त आणि फक्त अम्मूचा बोलबाला आहे. चित्रपटातील एकापेक्षा एक लावण्यांनी प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला असताना आता आणखी एक गाणे चर्चेत आहे. ज्यामध्ये फक्त अमृता नाही तर तिच्यासोबत प्राजक्ता माळीही दिसतेय. हे गाणे सवाल जवाबचे असून दोघीही शोभून दिसत आहेत.
कशी वाटली “नैना चंद्रापूरकर”..?
.
मला तर बुवा शिवलेली नव्हे खरी नऊवार नेसून, सगळे खरे सोन्या- मोत्याचे दागिने घालून, प्रिय अमृताला खडूस नेत्रकटाक्ष देत नाचायला जाम मज्जा आली 🥰🤪…
.
गाणं पाहिलं नसेल तर लगेच @youtube वर जाऊन बघा… #linkinbio too. 🎯
.#नैनाचंद्रापूरकर #चंद्रमुखी pic.twitter.com/NX4JCPcYyN— Prajjakta Malli (@prajaktamali) April 27, 2022
आपल्या दिलखेचक सौंदर्याने आणि नृत्याने सर्वांना घायाळ करणारी ‘चंद्रा’ आता सवाल जवाबची खमंग फोडणी घेऊन आली आहे. यात अभिनेत्री अमृता खानविलकरसोबत प्राजक्ता माळी दिसतेय. प्राजक्ताचा लूक एकदम हटके आणि जबरदस्त आहे. या सवाल जवाबाच्या लावणीला गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केले आहे. तर अजय- अतुल यांचे दमदार संगीत या गाण्याला लाभले आहे. तसेच मधुरा दातार, प्रियांका बर्वे आणि विश्वजीत बोरवणकर यांच्या आवाजाने गाण्याची रंगत आणखीच वाढवली आहे. शिवाय दिपाली विचारे यांचे नृत्यदिग्दर्शन असलेला हा ठसकेदार लावणीचा प्रकार प्रेक्षकांना मोहण्यात यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. आपल्या नव्या लूकबाबत पोस्ट करताना प्राजक्ताने लिहिले आहे कि, कशी वाटली “नैना चंद्रापूरकर”..? मला तर बुवा शिवलेली नव्हे खरी नऊवार नेसून, सगळे खरे सोन्या- मोत्याचे दागिने घालून, प्रिय अमृताला खडूस नेत्रकटाक्ष देत नाचायला जाम मज्जा आली..
या गाण्याबाबत चित्रपटाचा दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाला कि, या चित्रपटात आम्ही श्रृंगारीक लावणी, बैठकीची लावणी, सवाल जवाब असे लावणीचे विविध प्रकार हाताळले आहेत. या निमित्ताने लोककलेचा समृध्द वारसा पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘चंद्रमुखी’तील इतर गाण्यांप्रमाणे सवाल जवाबची रंगलेली ही चुरसही रसिकांना भावेल.
प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, अशोक शिंदे, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तर चित्रपटाचे छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केले आहे आणि अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाईंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाईटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत ‘चंद्रमुखी’ उद्या म्हणजेच २९ एप्रिल २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
Discussion about this post