हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाट्यगृहात जाऊन नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे चित्रपटांइतकेच नाटकही मनोरंजनाचे महत्वाचे माध्यम आहे. अनेकदा नाट्य प्रयोग सुरु असताना स्टेजवर कलाकृती सादर करणाऱ्या कलाकारांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये नाट्यगृहाची अस्वछता, बिघडलेला एसी आणि प्रेक्षकांचे सतत वाजणारे मोबाईल हे कलाकारांच्या मनस्तापाचे कारण होऊन बसले आहे. नाटक सुरु असताना मोबाईल सायलेंट वर किंवा ऐअरप्लेन मोडवर टाकावा इतके साधे कष्ट काही प्रेक्षक घेत नाहीत आणि याचा नाहक कलाकारांना शिवाय इतर प्रेक्षकांना त्रास होतो. यावर काही मराठी कलाकारांनी आधीच भाष्य केले आहे. यात आता अमृता सुभाषनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
प्लॅनेट मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अमृताला जेव्हा ‘नाट्यगृहात प्रेक्षक मोबाईलचा वापर करतात किंवा मोबाईलची लाईट मध्येच ऑन करतात तेव्हा कलाकारांच्या प्रतिक्रिया काय असतात?’ असा सवाल करण्यात आला. यावर अमृता सुभाष म्हणाली कि, ‘मी गिरीश जोशी यांच्याबरोबर काम केलंय. ते म्हणतात ना ‘चुकीला माफी नाही’ अगदी याचप्रकारे गिरीश कधीच प्रेक्षकांच्या अशा चुकांना माफी देत नाही आणि नाट्यगृहांमध्ये असे वागणे एकदम चुकीचे आहे. कित्येकदा आम्ही नाटक मध्येच थांबवून प्रेक्षकांना विनंती करतो हळूहळू या गोष्टी कमी होतील अशी मला आशा आहे. हल्ली लोकांचे मोबाईल वाजत नाहीत, ते मध्येच स्क्रिन ऑन करतात त्यामुळे चेहऱ्यावर लाईट येतो. लोकांना हे लक्षात येत नाही. परंतु संपूर्ण अंधारात असा मध्येच मोबाईल ऑन केल्यामुळे सादरीकरण करणाऱ्या कलाकाराचे लक्ष मात्र नक्कीच विचलित होते’.
या मुलाखतीवेळी अमृता सुभाषसह अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोलेदेखील इथे उपस्थित होत्या. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या कि, ‘प्रेक्षक जेव्हा असं काही वागतात तेव्हा सादरीकरण करणाऱ्या कलाकाराच्या मनात प्रश्न निर्माण होतो आपण उत्तम करतोय की नाही..? आपण कुठे कमी पडतोय का..? यामध्ये हळूहळू बदल करण्यासाठी प्रेक्षकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे’. यापूर्वी प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आणि सुमित राघवन यांनी नाट्य गृहांमध्ये प्रेक्षकांच्या सतत वाजणाऱ्या मोबाईलबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता अमृता सुभाषने आणि मुग्धा गोडबोले यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Discussion about this post