हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते सतिश कौशिक यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन झाले आहे. आज सकाळी अभिनेता अनुपम खेर यांनी हि दुःखद माहिती दिली. कौशिक यांच्या निधनाने भारतीय मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी ऐकताच अभिनेत्री हेमांगी कवीने सतीश कौशिक यांच्याविषयी खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने बालपणीचा एक किस्सा शेअर केला आहे.
हि पोस्ट शेअर करत हेमांगीने यात लिहिलंय कि, ‘Can we skip this day from our Calendar? लहानपणी आईने थोडा उशीर केला जेवण वाढायला की समोरचं ताट हातात घेऊन ते Glass ने बडवत “Calendar खाना दो” मोठमोठ्याने म्हणायचं. मग आई “असं ताट वाजवू नये” म्हणून आम्हांला बडवायची. पण आम्ही कुठे ऐकतोय तिचं. ती जी सवय लागली ती आजतागायत. काय गंमत होती किंवा आहे त्यात कुणास ठाऊक. तुमच्या सोबत काम करताना मी हा किस्सा तुम्हांला सांगितला तेव्हा तुम्ही हसून म्हणाला, “80-90s के हर बच्चे की यही कहानी है!” ८०-९० च्या दशकातल्या मुलांचं बालपण तुमच्या Calender ने समृद्ध केलंय आणि मनात कायमचं Tick ही करून ठेवलंय! असं म्हणतात जुनं calendar घरात ठेऊ नये पण हे Calendar मनाच्या भिंतीवर, आठवणींच्या खिळ्याला सदा अडकवलेलं राहील’.
अभिनेता सतीश कौशिक यांनी केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर एक उत्तम लेखक, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध क्षेत्रात सिने इंडस्ट्री गाजवली आहे. बॉलिवूड सिनेविश्वात पदार्पण करण्याआधी त्यांनी अनेक नाटकांमध्येदेखील काम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली असून जी पोकळी निर्माण झाली आहे ती न भरून निघणारी आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच सोशल मीडियाद्वारे विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी पोस्ट शेअर करत शोक व्यक्त करत आहेत. सतीश कौशिक यांच्या पप्पू पेजर, कॅलेंडर यांसारख्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत आणि कायम स्मरणात राहतील.
Discussion about this post