हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला गेल्या काही काळापासून सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे नवनवीन कलाकृती कधी येतील या प्रतिक्षेत प्रेक्षक वर्ग असतो. अलीकडच्या काळात ‘चंद्रमुखी’, ‘धर्मवीर’, ‘पांडू’, ‘झिम्मा’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस चांगलंच गाजवलं. अगदी प्रेक्षकांसह समीक्षकांनीही या कलाकृतींची पाठ थोपटली. यानंतर आता मराठी सिनेसृष्टीत मनोरंजनाचा बहार येतो आहे. अलीकडेच एकाचवेळी एक दोन नव्हे तर तब्बल ७ आगामी चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे.
हिंदीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांचे लेखन आणि निर्मिती करणा-या परितोष पेंटर यांच्या कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रॉडक्शन्स आणि राजेशकुमार मोहंती यांच्या एस.आर एन्टरप्रायजर्स या दोन मोठ्या निर्मिती संस्थांनी एकत्र आपल्या आगामी ७ चित्रपटांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या सातही चित्रपटांचे दिग्दर्शन मातब्बर दिग्दर्शक मंडळी करत आहेत. तर मनोज अवाना या चित्रपटांचे सहनिर्माते आहेत. शिवाय स्टारकास्ट देखील जबरदस्त असणार आहे. या सात चित्रपटांमध्ये ‘निरवधी’, ‘सुटका’, ‘एप्रिल फुल’, ‘फक्त महिलांसाठी’, ‘थ्री चिअर्स’, ‘एकदा येऊन तर बघा’ आणि ‘ती मी नव्हेच’ अशा कलाकृतींचा समावेश आहे.
यातील ‘निरवधी’ चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेत आणि यामध्ये सुबोध भावे, उपेंद्र लिमये आणि गौरी इंगवले हे प्रमुख कलाकार आहेत. तसेच ‘सुटका’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक करत आहे. यामध्ये स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहरे आणि ओंकार राऊत हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
याशिवाय ‘एप्रिल फुल’ ही एक थ्रिलर कॉमेडी कथानक असलेली कलाकृती आहे. याचे दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव करणार आहे. यामध्ये सिद्धार्थ जाधव, अंकित मोहन, रसिका सुनिल आणि रिंकू राजगुरु हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘फक्त महिलांसाठी’ या चित्रपटात सई ताम्हणकर, शिवानी रंगोळे, प्रसाद ओक आणि वंदना गुप्ते हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
‘थ्री चिअर्स’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन परितोष पेंटर करत आहेत आणि यामध्ये सिद्धार्थ जाधव, श्वेता गुलाटी, जयेश ठक्कर, भरत दाभोळकर, तेजस्विनी लोणारी, रेशम टिपणीस, विजय पाटकर आणि कॉमेडी किंग जॉनी लिव्हर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तसेच ‘एकदा येऊन तर बघा रिटर्न जाणारच नाही’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद खांडेकर करत आणि यामध्ये सयाजी शिंदे, गिरिश कुलकर्णी, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, वनिता खरात, राजेश शिरसाटकर, ओंकार भोजने, गौरव मोरे आणि पंढरीनाथ कांबळे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तसेच परितोष पेंटर लिखित ‘ती मी नव्हेच’ या चित्रपटात श्रेयस तळपदे, निनिद कामत आणि उर्मिला मातोंडकर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Discussion about this post