हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राहुल देशपांडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. राहुल देशपांडे यांना ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी हा पुरस्कार देणार आहेत. शिवाय सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखन या पुरस्कारासाठी अनमोल भावे यांना ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला आहे. या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला गौरविण्यात आले . तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा स्पेशल ज्युरी मेंशन अवॉर्ड ‘जून’ चित्रपटासाठी सिध्दार्थ मेननने पटकावला.
या पुरस्काराबाबत राहुल देशपांडे यांनी भावना व्यक्त केल्या आहे. ते म्हणाले कि, ‘हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ज्यावेळी माझे नाव या पुरस्कारासाठी जाहीर झाले त्यावेळी माझ्यासह माझ्या घरच्यांच्याही डोळ्यांत पाणी आले. हा पुरस्कार मी माझ्या आजोबांना म्हणजेच पंडित वसंतराव देशपांडे यांना समर्पित करत आहे. कारण संगीताचा वारसा मला त्यांच्याकडून लाभला. त्यामुळे हा त्यांचाही सन्मान आहे. या पुरस्कारावर नाव माझे असले तरीही मेहनत चित्रपटाच्या संपूर्ण टीमची आहे. इतक्या वर्षांची मेहनत फळाला आली.’
चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करतात. यंदाच्या ६८’व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार शंतनु गणेश रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ हा ठरला. तर जून चित्रपटासाठी सिद्धार्थने पुरस्कार पटकावला. ‘गोष्ट एका पैठणीची’ आणि ‘जून’ या दोन्ही चित्रपटांची निर्मिती ‘प्लॅनेट मराठी’ची आहे.
Discussion about this post