हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे लाडके कॅलेंडर म्हणजेच अभिनेते सतीश कौशिक यांनी ९ मार्च २०२३ रोजी जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले आणि बॉलिवूड सिनेविश्वावर शोककळा पसरली. सतीश यांच्या निधनाने त्यांचे अत्यंत जवळचे मित्र ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना मोठा धक्का लागला होता. मात्र स्वतःला सावरत आज सतीश कौशिक यांच्या वाढदिवसानिमित्त अनुपम खेर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांची जागा रिकामी असल्याचे म्हणत भावुक झाले आहेत.
अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘माझा प्रिय मित्र सतीश कौशिक! तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आज बैसाखीच्या दिवशी तू ६७ वर्षांचा झाला असतास. तुझ्या आयुष्यातील ४८ वर्षे मला तुझा वाढदिवस साजरा करण्याचे सौभाग्य मिळाले. म्हणून मी ठरवले आहे की आज संध्याकाळी आम्ही तुझा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्याचा प्रयत्न करू! शशी आणि वंशिका यांच्यासोबतची तुझी जागा रिकामी असेल’.
अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. शिवाय ‘मिस यु’ म्हणत त्यांची आठवण काढताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘मित्राच्या अनुपस्थितीत त्याचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा आणखी कोणतीही भेट योग्य असूच शकत नाही’. तर आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘अशी मैत्री आजकाल कुठे पहायला मिळते… आज सतीश सर हयात नाहीत मात्र अनुपम सरांच्या हृदयात आहेत.. याहून मोठी बाब काय असू शकते’.
Discussion about this post