हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. अनेकदा विविध विषयांवर विविध आशयाच्या पोस्ट ते शेअर करताना दिसतात. कधी राजकीय, कधी सामाजिक तर कधी अन्य विषयांवर ते व्यक्त होताना दिसतात. अनुपम खेर हे सध्या थायलंडमधील बँकॉकमध्ये गेले आहेत. याठिकाणी त्यांनी एक असं दृश्य पाहिलं जे आपल्या भारतीय चाहत्यांसह शेअर करणं त्यांना महत्वाचं वाटलं आहे. त्यांनी एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. जो प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हिंदू देव-देवतांच्या मूर्तीचे दर्शन घडत आहे.
अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते थायलंडच्या हायवेवर दिसत आहेत. या हायवे रोडच्या एका बाजूला महादेव, पार्वती आणि गणपती बाप्पाची मूर्ती पहायला मिळत आहे. अनुपम खेर यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे कि, ‘मित्रांनो, भारताच्या देवी- देवतांचे, भारताच्या परंपरेचे आणि भारताच्या संस्कृतीचे अस्तित्व संपूर्ण जगभरात आहे. त्याचे महत्त्व काय आहे, हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. थायलंडमधील बँकॉक शहरातील एका महामार्गावर रस्त्याच्या कडेला शंकर, पार्वती आणि गणपतीची मूर्ती आहे. हे पाहून मी भारावून गेलो आहे. जय शिव शंभो!’,
व्हिडिओमध्ये अनुपम खेर बोलताना दिसत आहेत कि, ‘थायलंडमधील नॅशनल हायवेवर शंकर देव, पार्वती देवी आणि गणपतीची मोठी मूर्ती पहायला मिळणं ही अनोखी पर्वणी होती. कित्येकदा आपल्याला त्यांचे दर्शन घेता येत नाही. पण देवांचा आशीर्वाद सर्व ठिकाणी असतो. भोलेनाथ, ओम नमः शिवाय’. अनुपम खेर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी ‘ओम नम: शिवाय’, ‘जय श्री राम’, ‘हर हर महादेव’ असे म्हटले आहे. तर एका नेटकऱ्याने असेही म्हटले आहे कि, ‘थायलंड हा हिंदू मूल तत्त्व मानणारा देश आहे. येथे विविध देवता आणि सण पाहणे खूप सामान्य आहे’.
Discussion about this post