हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नवरात्र उत्सवात अनेक अभिनेत्री हटके फोटोशूट करीत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. त्यापैकी एक म्हणजे अपूर्वा नेमळेकर. रात्रीस खेळ चाले शेवंता पात्राच्या सहाय्याने विशेष पसंती मिळवणारी अपूर्वा यंदा देवीच्या नानाविध रूपांचे जागरण करताना दिसली. अपूर्वाने वेगवेगळ्या देवीच्या रुपातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अगदी कोल्हापूरची अंबाबाई, मुंबईची मुंबादेवी, कर्नाटकातील दुर्गा परमेश्वरी, राशीनची यमाई देवी, बंगालची त्रिनयन दुर्गामाता, कार्ल्याची एकविरा देवी, चंद्रपूरची महाकाली आणि विद्येची देवी सरस्वती अशा देवीच्या विविध रूपातील तिचे फोटोशूट पाहून चाहत्यांनी तिच्यामुळे देवीच्या रूपांचे दर्शन घडल्याचे म्हटले आहे. मात्र तिच्या काही चाहत्यांनी या फोटोशूटवर आपली नाराजी व्यक्त करीत भल्या मोठ्या अपमानकारक कमेंट केल्या आहेत. या नाराजीवर अपूर्वाने मात्र संयमी उत्तर दिले आहे.
त्याच झालं असं कि, अपूर्वाच्या नवरात्र फोटोशूटवर नाराज झालेल्या सोशल मीडियावरील एका युजरने म्हटले की, “डिसलाइक, डिसलाइक, १०० टक्के डिसलाइक.आपण एवढे पूजनीय नसतो, सांगितले ना, देव देवीच्या चेहऱ्याला आपले चेहरे मार्फ करून लावायला, बस्स झाले नका खेळू आमच्या भावनांशी. आणि वाटलं तर हा फोटो बनवून तूम्ही घरात लावा, बघत बसा. पण कृपया लोकांवर काहीही नका लादू. कळत नाही एकदा पोस्टला कॉमेंट देऊन. आणि जितक्या वेळा तुम्ही माझे कमेंट डिलिट कराल, मी तितक्यांदा हीच सेम कमेंट्स आणि लोकांमध्ये याबद्दल जागृती करणार, मग तूम्ही कुठेही हा मार्फ पिक टाका.” चाहत्यांच्या या नाराजीवर अपूर्वाने संयमपूर्वक उत्तर दिले आहे. त्यात ती म्हणाली की, मी व माझ्या सहकाऱ्यांनी, प्रत्यक्ष-वा-अप्रत्यक्ष असा कधीच दावा केला नाही कि, आम्ही दैवी व्यक्तिमत्त्वे आहोत. मी, आणि माझे सहकारी निव्वळ कलेचे उपासक आहोत. हा प्रकल्प,ही आमची एक संकल्पना आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही, देवीचे विविध रुप आणि त्या विशिष्ट शक्तीपीठाची महती भविकांपर्यंत पोहोचवण्याचा, एक निखळ प्रामाणिक प्रयत्न आहे.
पुढे, आपल्या संस्कृतीचा वारसा लुप्त होत चालला आहे, त्याला उजाळा देण्याचा हा आमचा प्रामाणिक आणि निस्वार्थी प्रयत्न आहे. ह्या छोट्याशा प्रकल्पात आम्हा सर्वांचा कोणताही व्यावसायिक हेतू वा फायदा नाही. अशा पद्धतीने, अप-समीक्षा उघडपणे करणे म्हणजे आपल्या संस्कृतीचे अवमान, आवज्ञा होय. वैयक्तिकरित्या एखाद्याला ही संकल्पना किंवा त्याची मांडणी पटली नसेल तर त्याने, दुर्लक्ष करावे, किमान सार्वजनिक व्यासपीठावर असे उदात विचार मांडून इतरांच्या भावनांचा अवमान करू नये. हिंदू संस्कृतीत सहिष्णुतेला नुसतेच प्राथमिक नाही तर अनन्य साधारण महत्त्व आहे.”परस्पर देवो भव” म्हणजेच एकमेकांमध्ये देव पाहा अशी, आपल्या हिंदू संस्कृतीची शिकवण आहे. तेव्हा माझे व माझ्या सहकाऱ्यांचे आपल्याला वैयक्तिक आवाहन राहील की, आपण आपल्या संस्कृतीचे विडंबन करू नये आणि ही अपप्रचिती इथेच थांबवावी.
Discussion about this post