हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण राज्यभरात नवरात्रीचा उत्सव सुरु असून आज सप्तमीचा दिवस उजाडला आहे. नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्व असल्यामुळे सर्वत्र शांततेचे, अध्यात्माचे आणि सात्विक पावित्र्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सप्तमीचा दिवस हा नवरात्रीतील अत्यंत महत्वपूर्ण दिवस मानला जातो. मुळातच नवरात्र हा उत्सव स्त्री शक्तीच्या स्वरुपांची पूजा करण्यासाठी विशेष काळ मानला जातो. काही लोक नऊ दिवस उपवास करतात तर काही जण सप्तमीपासून दसऱ्यापर्यंत उपवास करतात. या शक्ती उत्सवाचे निमित्त साधून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने आपल्या चाहत्यांना आईच्या मूळ आणि विविध स्वरूपाचे दर्शन देण्याचा निर्धार केला आहे. तिने केलेल्या या फोटोशूटच्या माध्यमातून विविध ठिकाणच्या शक्तिपीठांची रूपे ती चाहते आणि भाविक यांच्यासाठी उपलब्ध करून देताना दिसत आहे.
आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे आणि आजच्या दिवशी तिने चंद्रपूरची आराध्य देवता महाकालीचे अद्भुत तेजस्वी असे स्वरूप धारण केले आहे. अतिशय प्राचीन असे शिल्पकलेचे उत्तम उदाहरण देणारे हे मंदिर सुमारे ६० फुट लांब – रुंद असून याची उंची सुमारे ५० फुट आहे. शिवाय हे मंदिर पश्चिम मुखी आहे. तर येथे तळघरात ५ फुट उंचीची आई महाकालीची मूर्ती आहे. या देवीच्या एका हातात खड्ग असून दुसऱ्या हातात ढाल आहे. चैत्र महिन्यात येथे यात्रा भरते. खांडक्या बल्लाळशहा या गोंड राजास ही मूर्ती दिसल्याची मोठी आख्यायिका आहे. त्यानंतर राणी हिराईच्या कार्यकाळात येथे मंदिर उभारले गेले. दरवर्षी नवरात्रीत या देवीला साज चढविला जातो.
हा फोटो शेअर करताना अपूर्वाने कॅप्शनमध्ये लिहिले कि, नवरात्रीचा सातवा दिवस! रंग – निळा. देवी- चंद्रपूरची महाकाली🙏 . चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली हे गुफा मंदिर आहे. चंद्रपूर येथील महाकाली मंदिर गोंडकालीन असून याला वाकाटक कालाचाही संदर्भ आहे. महाकाली मंदिराच्या भिंतींवर शिल्पकलेहून तिबेटी आणि हिंदू परंपरेचे उत्कृष्ट मिश्रण दिसून येते.रंगीत चित्रकला हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. मी अणि माझ्या टीमने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
याआधी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अपूर्वाने कोल्हापूर, करवीर निवासिनी आई अंबाबाई महालक्ष्मीचे स्वरूप धारण केलेले फोटो शेअर केले होते. यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तिने मुंबापुरीची ग्रामदेवता मुंबादेवीचे स्वरूप धारण केलेले फोटो शेअर केले होते. तर तिसऱ्या दिवशी तिने कर्नाटक उडपी येथील दुर्गा परमेश्वरीचे रूप धारण केलेले फोटोशूट शेअर केले होते आणि चौथ्या दिवशी राशीनची यमाई माताचे रूप धारण केलेले फोटोशूट तिने शेअर केले आहे. पुढे पाचव्या दिवशी बंगाली देवीचे स्वरूप धारण केलेले फोटोशूट शेअर केले होते आणि सहाव्या दिवशी कार्ल्याच्या एकविरा आईचे नयनरम्य स्वरूप धारण केलेले फोटोशूट शेअर केले होते. तिच्या या फोटोशूटला प्रचंड पसंती मिळत असून अनेकांनी तिच्या फोटोंमधून देवी आईचे दर्शन घडल्याचे म्हणत तिचे व तिच्या टीमचे कौतुक केले आहे.
Discussion about this post