हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ सध्या अतिशय वेगळ्या आणि रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेतील मुख्य पात्र अरुंधती अर्थात आई तिच्या पुढील आयुष्याचा विचार करू लागली आहे. येत्या भागात लवकरच अरुंधती आणि आशुतोष एकमेकांशी लग्नगाठ बांधताना दिसणार आहेत. त्यामुळे सध्या मालिकेत लगीनघाई सुरु झाल्याचे दिसत आहे. मालिकेतील मेहंदी सोहळ्याचा प्रोमो काही तासांपूर्वीच समोर आला आहे. आणखी एका प्रोमोमध्ये अरुंधती आणि आशुतोष यांनी एकमेकांसाठी अतिशय गोड उखाणा घेतला आहे.
दरम्यान आज रिलीज झालेल्या नव्या प्रोमोमध्ये अरुंधती आणि आशुतोष एकमेकांच्या बाजूला बसलेले दिसत आहेत. वधू होण्यासाठी सज्ज झालेली अरुंधती आणि वर होण्यासाठी सज्ज असलेला आशुतोष सुंदर पारंपरिक मराठी उखाणा घेताना दिसून आले आहेत. अरुंधती आणि आशुतोषच्या उखाण्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर प्रेक्षकदेखील विविध कमेंट्स करत आपला आनंद व्यक्त करत आहेत. ‘आई कुठे काय करते’ हि मालिका सध्या टीआरपीची एक वेगळीच लेव्हल गाठत आहे.
मालिकेत आशुतोष आणि अरुंधतीच्या लग्नाचा ट्रॅक सुरु असताना अनिरुद्ध प्रचंड सतावलेला दिसत आहे. काही ना काही काड्या करून तो विघ्न आणण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे या लग्नाला विलंब होत आहे. मात्र आता लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. अरुंधतीचा मेहंदी सोहळा पार पडताना अनिरुद्धने विघ्न आणून अरुंधतीच्या हातावरची मेहंदी पुसली. या सर्व प्रकारानंतर मालिकेच्या नव्या भागाच्या प्रोमोत त्यांनी घेतलेले उखाणे व्हायरल झाले आहेत. यावेळी अरुंधतीने उखाणा घेत म्हटलं, ‘आयुष्याच्या मध्यानीला अनुभवले शांत चांदणे सुखाचे..ध्यानीमनी नसताना लाभले आशुतोष जोडीदार आयुष्याचे. तर दुसरीकडे आशुतोषने उखाणा घेत म्हटलं, ‘बसलो होतो माझा मी माझ्याच विचारांच्या गावी.. दूरच्या क्षितिजावर होती मनातली पहाट नवी.. अवचित एका रुक्ष क्षणी मोगऱ्याचा सुगंध दरवळला… अरुंधतीच्या येण्याने मला जगण्याचा अर्थ समजला’.
Discussion about this post