हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ मालिकेचे कथानक गेल्या काही दिवसांपासून काही औरच वळणावर येऊन पोहोचले आहे. अलीकडच्या भागांमध्ये इतके ट्विस्ट पटापट आले कि क्षणभर मालिकेचे कथानक कोणत्या दिशेला वाहत आहे हेच समजेनासे झाले होते. एकीकडे देशमुखांच्या घरात बारशाचा सोहळा झाला आणि दुसरीकडे अरुंधती- आशुतोषने लग्नाचा निर्णय घेतला. म्हणायला या मालिकेत आनंदी आनंद सुरु असला तरीही कात कारस्थानाशिवाय मालिकेला अर्थच काय..? अरुंधतीचं आशुतोषसोबत लग्न होऊ नये म्हणून अनिरुद्ध शक्य ते सगळे प्रयत्न करत आहे. पण अरुंधतीचा निर्णय तो बदलू शकेल का हे पाहण्यात खरी मजा आहे.
अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नाच्या विषयामुळे देशमुख कुटुंबात मोठी हलचल निर्माण झाली आहे. अरुंधती आणि आशुतोषचं लग्न मोडायचं म्हणून अनिरुद्ध काहीही करायला तयार आहे. पण आता त्याचे सगळे प्रयत्न, प्लॅनिंग- प्लॉटिंग फेल ठरताना दिसत आहे. अभिषेकाची लेक जानकीच्या बारश्यात अनिरुद्धने चांगलाच तमाशा केला आणि यावेळी अप्पांनी अरुंधतीच्या लग्नाचा विषय काढल्यामुळे कांचनने गोंधळ घातला. या गोंधळात अप्पांची तब्येत बिघडली आणि ते चक्कर येऊन कोसळले. यावेळी सुरु गोंधळ पाहून आशुतोषने निघणे योग्य समजले आणि हे पाहून अरुंधतीला वाईट वाटलं. यामुळे आता तिने ठामपणे लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
आशुतोष जाताना पाहून अरुंधती त्याला आपला निर्णय ठाम असल्याचे सांगते. अरुंधती म्हणते की, ‘आज जशी तुम्ही माझी साथ दिली, तशी तुमची साथ मला आयुष्यभर हवी आहे. मी तुमच्यासोबत आयुष्यभर आनंदी राहू शकते याची मला खात्री आहे. म्हणूनच मी तुमच्याशी लग्न करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे आणि त्यापासून मला कुणीही अडवू शकत नाही.’ यामुळे मालिकेत आता आणखी एक नवा ट्रॅक पहायला मिळणार आहे. पण अरुंधतीच लग्न अनिरुद्ध होऊन देईल का..? त्याचे पुढचे प्लॅन यशस्वी होतील का..? या प्रश्नांची उत्तरं आगामी भागात समजतील.
Discussion about this post