हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधील ट्विस्ट नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात. अलीकडेच या मालिकेतील आई अर्थात अरुंधती आणि तिचा मित्र आशुतोष यांचं लग्न झालं. ज्यामुळे अरुंधती पहिल्या लग्नातून पूर्ण मुक्त झाली असून दुसऱ्या संसारात रमताना दिसते आहे. तिच्या पहिल्या पतीने म्हणजेच अनिरुद्धने तिला शक्य तितका त्रास देण्याचा प्रयत्न केला पण आता ती या सगळ्या त्रासातून सुटली आहे. पण तिच्या डोक्याचा ताप काही जाईनाच. एकीकडे नवा संसार तर दुसरीकडे मुलांच्या आयुष्यातील प्रॉब्लेम सोडवताना अरुंधतीची मात्र तारेवरची कसरत सुरु आहे.
मागील भागांत आपण पाहिलं कि, अरुंधतीचा मुलगा यश आणि गौरी एकमेकांशी लग्न करणार होते. त्यांचा साखरपुडा देखील झाला होता आणि असे असताना नंतर गौरीने परदेशी जाण्याचा निर्णय घेतला. यशने तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न करूनही गौरीने मात्र त्याच्यापुढे करियर निवडलं आणि ती निघून गेली. यश मात्र तिची वाट पाहत बसला. अरुंधतीच्या लग्नात ती परत आल्याने यश आनंदी होता मात्र गौरीने झालेला साखरपुडा मोडला. ज्यामुळे यश पुरता कोसळला. यावेळी अरुंधतीने आई म्हणून यशच्या डोक्यावर मायेने हात फिरवला आणि त्याची समजूत काढली. यातून अरुंधती सावरतेच तोवर ईशा प्रेमात पडल्याचे समोर आले. इतकेच काय तर ईशा पळूनही गेली.
अनिरुद्ध आणि अरुंधतीची मुलगी ईशा ही अरुंधतीचा दुसरा नवरा आशुतोषचा पुतण्या अनिशच्या प्रेमात पडली आहे. त्यामुळे या नात्याला अनिरुद्धचा पूर्ण विरोध आहे. शिवाय अनिशचे तिच्यावर कितीही प्रेम असले तरीही तो इतक्यात लग्नाला तयार नाही असे त्याचे म्हणणे आहे. यामुळे एकटी पडलेली ईशा शेवटी घर सोडून पळून जाते आणि अनिशला भेटते. यावेळी अनिश तिची खूप समजूत काढतो. पण ईशा ऐकायला तयार नसते.
इतक्यात अरुंधती तिथे पोहोचते आणि ईशाच्या कानशिलात लागवते व तिला घरी घेऊन येते. इथे ईशा लग्नाबाबत ठाम असल्याचे सांगते. त्यामुळे अरुंधती तिला पाठिंबा देत ईशा आणि अनिशच्या साखरपुड्याचा प्रस्ताव घरच्यांसमोर मांडते. मात्र याला ईशाचे वडील म्हणून अनिरुद्ध विरोध करतो. आता ईशा अरुंधती आणि अनिरुद्ध दोघांची मुलगी असल्यामुळे आई काय पणाला लावणार..? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Discussion about this post