हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अनेक मालिका प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाल्या आहेत. ज्यामध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील अनेक मालिकांचा समावेश आहे. नुकताच ‘स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेचे कथानक, कलाकार प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले होते. त्यामुळे मालिकेला निरोप देताना प्रेक्षक भावुक झालेच, शिवाय मालिकेतील कलाकार देखील भावुक झाले. या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या अभिनेत्री आसावरी जोशी यांनी एक भावुक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
स्टार प्रवाह वरील ‘स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा..’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत होती. काही काळ या मालिकेने टिआरपीच्या रेसमध्ये अव्वल नंबर काढला होता. अखेर ७०० भागांचा टप्पा पूर्ण करून या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि यावेळी मालिकेतील मध्यवर्ती भूमिका साकारलेल्या अभिनेत्री आसावरी जोशी यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांची हि पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आसावरी जोशी यांनी ‘स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा’ या मालिकेत आदिती सूर्यवंशी ही भूमिका साकारली आहेत.
आसावरी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ‘आज स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही प्रेक्षकांची लाडकी मालिका निरोप घेत आहे. मला माहिती आहे, माझ्याप्रमाणे तुम्ही सर्वजण खूपच भावुक झाले आहात. आजच या मालिकेचे ७०० भाग पूर्ण होत आहेत. या मालिकेच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं मनोरंजन करता आलं याचा आनंद आहे. लवकरच एका नवीन मालिकेच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी मला तुम्हा सर्वांच्या सदिच्छांची गरज आहे…धन्यवाद…’. ‘स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा’ या मालिकेत पूजा बिरारी आणि अभिनेता अक्षर कोठारी मुख्य भूमिकेत तर आसावरी जोशी, अशोक शिंदे, सविता प्रभूणे, प्रसाद पंडित या कलाकारांच्या मध्यवर्ती भूमिका होत्या.
Discussion about this post