हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। माता जिजाऊंनी स्वातंत्र्यतेचे पाहिलेले स्वप्न, बारा हजार शत्रूंवर विजय मिळवणारे आपले तीनशे मावळे आणि बाजीप्रभूंच्या झणाणत्या रणझुंजार कर्तृत्वाचे भाष्य करणारा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट येत्या दिवाळीत सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना वेगळीच उत्सुकता आहे. कारण या चित्रपटाला अत्यंत तगडी स्टारकास्ट लाभली आहे. झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या आणि अभिजित देशपांडे यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या या चित्रपटातील बाजीप्रभू देशपांडे यांचे थोरले बंधू फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या महत्वपूर्ण भूमिकेवरून पडदा उघड झाला आहे. या भूमिकेत अभिनेता अशोक शिंदे प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत.
झी स्टुडिओजने हे पोस्टर रिलीज करताना एक कॅप्शन देत या भूमिकेची ओळख करून दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे कि, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर साथीदार आणि गनिमांना पुरुन उरणाऱ्या झुंजार बाजीप्रभू देशपांडे यांचे थोरले बंधू फुलाजीप्रभू देशपांडे. त्यांच्या भूमिकेत अभिनेते अशोक शिंदे. लढण्यासाठी लाखो हत्तींचं बळ देणाऱ्या शिवमंत्राचा आवाज संपूर्ण हिंदुस्थानात घुमणार… येत्या दिवाळीत, २५ ऑक्टोबरपासून ‘हर हर महादेव’ मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून आपल्या भेटीला येणार.’
भारताचा इतिहास प्रत्येकाला कळावा, म्हणून तब्बल ५ विविध भाषांतून ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अभिजीत देशपांडे यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स’ने केली आहे. येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘हर हर महादेव’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेत सुबोध भावे तर त्यांच्या पत्नी महाराणी सईबाईंच्या भूमिकेत सायली संजीव दिसणार आहे. याशिवाय बाजीप्रभूंच्या भूमिकेत शरद केळकर आणि त्यांच्या पत्नी सोनाबाईंच्या भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार आहे.
Discussion about this post