हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत अनघा साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अश्विनी आणि त्यासोबत एक समाजसेविका देखील आहे. ‘रयतेचं स्वराज्य संस्थान’ या तिच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ती ठिकठिकाणी विविध उपक्रम राबवताना दिसते. नुकतीच अश्विनी तिच्या संस्थेतील काही सहकाऱ्यांसह तुळापूर येथील शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळी गेली होती. येथे जाऊन ती संभाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाली. यावेळी तिला आलेला अनुभव तिने चाहत्यांसह शेअर केला आहे.
या अनुभवाबद्दल पोस्ट शेअर करताना अश्विनीने लिहिले आहे कि, ‘छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळी जावून रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यचे सदस्य, पदाधिकारी नतमस्तक झाले. भावना साधी, सोप्पी होती की पुढील काळात आमच्याकडून चांगले काम व्हावे. आमच्या मनात शिवविचार रुजावा. आम्ही सगळेच भावूक झालो होतो. तिथली माती, हवा आणि इंद्रायणी, भीमा, भामा नद्यांचा त्रिवेणी संगम साक्ष देतात आमच्या छत्रपतींनी आमच्यासाठी केवढे मोठे बलिदान दिले. बलिदान मास येतो तेव्हा हजारो, लाखो शिवभक्तांच्या आणि शंभूभक्तांच्या उरात धडकी भरते. कसं सोसल आमच्या राजाने हे सगळे… सर्व ग्रामस्थांचे मनपुर्वक धन्यवाद जे प्रतिष्ठानचे काम पाहतात आणि कौतुकही करतात’.
अभिनेत्री अश्विनी सध्या तिच्या मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस्त असली तरीही ‘रयतेचं स्वराज्य संस्थान’ या तिच्या संस्थेसाठी ती नेहमीच वेळ काढताना दिसते, याहीवेळी असाच शुटिंगमधून काहीसा वेळ काढून अश्विनी तिच्या संस्थेच्या सहकारी मंडळींसोबत तुळापूरला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळी भेट देण्यासाठी गेल्याचे पहायला मिळाले. अश्विनी नेहमीच विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असते. यामुळे तिच्या अभिनयाशिवाय तिच्या सामाजिक कार्यासाठीदेखील तिला ओळखले जाते. शिवाय तिच्या या कामाचे कौतुकदेखील केले जाते. सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ती अनघाची भूमिका साकारतेय. तर याआधी अश्विनीने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत संभाजी महाराजांची बहीण राणूआक्कांची भूमिका साकारली होती. या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले होते.
Discussion about this post