हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। डोळ्यात स्वप्न घेऊन, आपल्या घरगुती पदार्थांचा स्वाद कायम राखत आणि मसाल्यांची जादू वापरून आसाम बॉय नयनज्योती सैकिया ठरला मास्टरशेफ ऑफ इंडिया सीजन ७ चा विजेता.
जवळपास तीन महिने स्वाद आस्वादाच्या नवनवीन कसोट्यांवर खरं उतरून नयनज्योतीने शेवटी हा किताब मिळवलाच. अत्यंत लोकप्रिय कुकिंग रिऍलिटी शो मास्टरशेफ ऑफ इंडियाच्या सातव्या सिजनमध्येसुद्धा देशभरातून विविध कोपऱ्यातले होम कुक शेफ होण्याचं स्वप्न घेऊन आले होते. यांपैकी नयनज्योतीचं शेफ होण्याचं स्वप्न आता साकार झालं आहे.
अनेक आव्हानांची मालिका पार केल्यानंतर नयनज्योती सैकिया हा मास्टरशेफ ऑफ इंडिया सीझन ७’चा विजेता ठरला. तर सांता सरमाह या होमकुक फर्स्ट रनरअप आणि मराठमोळी स्पर्धक सुवर्णा बागुल या सेकंड रनरअप ठरल्या.
नयनज्योतीला हा किताब देताना तीनही परीक्षक आणि लोकप्रिय तसेच सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर अत्यंत आनंदी दिसले. नयनज्योतीला बक्षीस म्हणून रुपये २५ लाखाचा धनादेश देण्यात आला. सोबतच ‘मास्टरशेफ इंडिया’ची प्रतिष्ठित ट्रॉफी आणि अखेर तो गोल्डन शेफ कोटही प्रदान करण्यात आला.
तर फर्स्ट रनरअप आसामच्या सांता सरमाह आणि सेकंड रनरअप महाराष्ट्राच्या सुवर्णा बागुल या दोघींनाही प्रत्येकी पाच लाखांचे धनादेश आणि मेडल देऊन सन्मानित केले गेले. मास्टरशेफ ऑफ इंडियाच्या ग्रँड फिनालेसाठी खास जगप्रसिद्ध लोकप्रिय शेफ संजीव कपूर एक नवं चॅलेंज घेऊन आले होते.
यांच्यासह शेफ रणवीर ब्रार, विकास खन्ना आणि गरिमा अरोरा यांनी मिळून तिन्ही फायनलिस्ट होमकुकसाठी ‘सिग्नेचर थ्री- कोर्स मील’ बनवण्याचे चॅलेंज दिले होते. या चॅलेंजमध्ये आपली छाप पडून मास्टर शेफ ऑफ इंडियाचा संपूर्ण प्रवास त्या प्लॅटरमध्ये उतरवून नयनज्योतीने फायनल कोर्स मीलचे चॅलेंज पूर्ण केले आणि विजयावर शिक्कामोर्तब केला.
Discussion about this post