हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय कलाकार अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, उर्मिला कानेटकर- कोठारे, मानसी मोघे अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘ऑटोग्राफ’ या चित्रपटात एक प्रेमकथा पहायला मिळते. आयुष्यभर जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी हा चित्रपट सांगतो. एका व्यक्तीच्या खऱ्या प्रेमाच्या शोधाची आणि त्याच्या या प्रवासात त्याला भेटलेल्या माणसांची ही गोष्ट आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित हा चित्रपट येत्या १४ मे २०२३ रोजी प्रदर्शित होतो आहे. पण हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला कोणतेही तिकीट खरेदी करायचे नाहीये. अहो ओटीटीच्या सब्स्क्रिप्शनचीसुद्धा गरज नाही. नवल आहे पण खरं आहे!
होय. तुम्ही अगदी बरोबर वाचताय. ‘ऑटोग्राफ’ हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जायची गरज नाही, तिकीट काढायची गरज नाही आणि अगदी OTT प्लॅटफॉर्मच्या सब्स्क्रिप्शनचीसुद्धा गरज नाही. कारण हा चित्रपट थिएटर आणि ओटीटीआधी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रदर्शित होतो आहे. येत्या रविवारी १४ मे २०२३ रोजी दुपारी १ वाजता ‘ऑटोग्राफ’ हा चित्रपट स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होईल. त्यामुळे सर्व प्रेक्षक आपल्या घरीच बसून या लव्ह स्टोरीचा आनंद घेऊ शकणार आहेत. आतापर्यंत टेलिव्हिजनच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते त्यामुळे हा प्रयोग नक्कीच धमाका करणार आहे.
ऑटोग्राफ सिनेमाचे दिग्दर्शक आणि स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे या सिनेमाविषयी म्हणाले कि, ‘लव्हस्टोरी करायला एक वेगळीच मजा असते. प्रत्येक लव्हस्टोरी आपल्याला कुठेतरी आपलीच आहे असं भासवते आणि म्हणूनच ती प्रत्येकाच्या मनाला भिडते. ऑटोग्राफ सुद्धा अशीच एक लव्हस्टोरी आहे. जगातला प्रत्येक माणूस या अश्या प्रवासातून गेलाय पण याचा शेवट मात्र अनुभवण्यासारखा आहे. दिग्दर्शक म्हणून मला तो फार आवडलाय आणि मला खात्री आहे रसिकांना सुद्धा तो नक्की आवडेल. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहवर हा सिनेमा प्रदर्शित होतोय याचा अतिशय आनंद होतोय’.
Discussion about this post