हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट गेल्या आठवड्यात शुक्रवारी, २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटातून महाराष्ट्राच्या मातीतील लोककलावंत कसे घडले.. त्यांची कारकीर्द कशी होती आणि त्यांनी आपल्या कलेतून समाजासाठी कसे कार्य केले हे पहायला मिळत आहे. हा चित्रपट केवळ कथा नसून यशोगाथा आहे. लोककलावंत कृष्णराव गणपतराव साबळे अर्थात महाराष्ट्राचे लाडके शाहीर या चित्रपटातून पुन्हा एकदा आपल्या भेटीला आल्याचे अनेक प्रेक्षकांनी म्हटले. ज्यामध्ये कलाकारांपासून ते राजकारणी मंडळींपर्यंत अनेक दिग्गजांचा समावेश आहे.
सध्या केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट चर्चेचा विषय ठरताना दिसतो आहे. या चित्रपटातून अंकुश चौधरीने शाहीर साबळे यांचे हुबेहूब दर्शन घडवीत महाराष्ट्रातील प्रेक्षक वर्गाच्या काळजाला हात घातला आहे. शाहीर केवळ गायक नव्हते तर ते लोकनायक देखील होते. मराठी माणसाच्या मनातली ज्योत पेटवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य ते आपली कला मातीत रुजवण्यासाठी केलेली धडपड या चित्रपटात पहायला मिळत आहे. त्यामुळे हा चित्रपट कलाकारांच्या हृदयाजवळचा आहे. मराठी संगीत विश्वातील प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेने ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट पाहिल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने एक फोटो शेअर केला आहे आणि सोबत कॅप्शनमध्ये चित्रपटातील कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शन याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हि पोस्ट शेअर करताना अवधूत गुप्तेने लिहिले आहे कि, ‘ ‘महाराष्ट्र शाहीर’ – मराठी चित्रपट सृष्टीला अभिमान वाटावा असा.. साजरा करण्यासारखा.. सिनेमा काल मित्रांसोबत पाहिला! ‘मी वसंतराव‘ आणि ‘महाराष्ट्र शाहीर‘ – दोन गायकांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट जवळपासच्या कालावधीमध्ये प्रदर्शित झाले आणि पिढ्यान् पिढ्या गेल्या तरी देखील, शास्त्रीय असो वा लोकसंगीत गायक, आम्हा गायकांच्या आयुष्यातील संघर्ष हा फारसा बदललेला नाही याची जाणीव झाली! अमित दोलावत, निर्मिती ताई, दुष्यंत, सना आणि सर्वच कलाकारांची कामे प्रचंड आवडली! मात्र अंकुशच्या आजवरच्या कामामध्ये हे सर्वोत्कृष्ट काम आहे असे आवर्जून सांगावेसे वाटते! अजय-अतुल चे संगीत नेहमी प्रमाणे अप्रतिम! केदार, तुझी मेहनत आणि बाबांवरचं तुझं प्रेम प्रत्येक फ्रेम मधून ओसंडून वाहताना दिसतंय. ते जिथे कुठे असतील तेथून तुला भरभरून आशीर्वाद देत असणार हे नक्की!! संजयजी.. असा चित्रपट निर्मित केल्याबद्दल खरंच खूप आभार!!’
Discussion about this post