हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शाळेत असताना पुस्तकांत, फळ्यांवर लिहिलेले ‘महाराष्ट्र गीत’ गाताना उर कसा अभिमानाने भरून यायचा. आजही मुलांसाठी ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे गीत हृदयाच्या धडधडप्रमाणे आहे. प्रसिद्ध कवी राजा बढे यांनी लिहिलेलं आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत कृष्णराव ऊर्फ शाहीर साबळे यांनी तडफदार आवाजात गायलं होतं. तर तब्बल ६२ वर्षानंतर या गाण्याला महाराष्ट्राचं अधिकृत राज्यगीत म्हणून सन्मान प्राप्ती झाली आहे आणि म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाचा उर आजही अभिमानाने भरून आला आहे.
या महाराष्ट्र गीताचं संगीतकार अवधूत गूप्ते याने काही वर्षांपूर्वी त्याच्या करिअरच्या सुरुवातीला नवं व्हर्जन सादर केलं होतं. जे सुरुवातील नाकारलं गेलं पण पुढे युथने या गाण्यालाप पसंती दिली. या गाण्यात बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर एकदम कडक मराठमोळ्या लूकमध्ये दिसली होती. या गाण्याला राज्यगीताचा सन्मान मिळाल्यानंतर अवधूतने मुख्यमंत्र्यांना एक आभार पत्र लिहिले आहे आणि सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पत्रात त्याने काय लिहिलंय ते जाणून घेऊया खालीलप्रमाणे:-
प्रति,
माननीय मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य
जय जय महाराष्ट्र माझा ह्या गीताला राज्यगीत म्हणून स्विकारण्याच्या निर्णयाचे मी महाराष्ट्राचा नागरिक म्हणून प्रचंड कौतूक करतो.
महाराष्ट्राचा भौगौलिक,ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समृद्धीचा सार्थ अभिमान या गाण्याच्या शब्दा शब्दात ठासून भरलेला आहे. तो अभिमान केवळ मराठी माणसा पुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण देशाला, किंबहुना जगाला सुद्धा ऐकू जाईल इतक्या आवाजात विविध प्रकारे, विविध ठिकाणी, विविध मार्गाने आणि विविध भाषांमधून दवंडी पिटवून सांगायला हवा.
आता राज्यगीताचा सम्मान राखणे हे बंधनकारक राहिल हे स्वागतार्ह. सादरीकरणाच्या नियमावलीमुळे या गीताचा जगभर पसरत असलेला परिमळ उलट प्रतिबंधीत होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.
काही वर्षांपूर्वी पुरोगामी विचारांनी भारताचा झेंडा फडकवण्याचे नियम शिथिल केल्यानं ज्याप्रकारे आता गल्ली बोळात,नाक्या नाक्यावर तिरंगा डौलात फडकताना दिसतो. त्याचप्रकारे आता हे नवीन महाराष्ट्र राज्यगीत महाराष्ट्राच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात सतत ऐकू येवो हीच आई एकविरेचरणी प्रार्थना! जय जय महाराष्ट्र! आपला, अवधूत गूप्ते
देशात आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीगसड, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, ओडिशा, पुद्दूचेरी, तामिळनाडू आणि उत्तरखंड या एकूण १२ राज्यांचं अधिकृत राज्यगीत आहे. यात आता महाराष्ट्र सामिल होत आहे. राज्याच्या स्थापनेनंतर ६२ वर्षांनी का होईना राज्याला अधिकृत गीत लाभलं आहे. त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रीयन आता गर्वाने ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत यापुढेही असाच गात राहणार यात काही किंतु परंतु उरलेला नाही.
Discussion about this post