हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय अध्यात्मिक मालिका ‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’ च्या गोरेगाव पूर्व फिल्म सिटी येथील सेटवर मोठा राडा झाल्याचे समजत आहे. सेट निर्मात्याला अगदी किरकोळ गोष्टीवरून वाद घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांचा पाय मोडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पीडित सेट निर्माता अलंकार भावरे (४५) यांनी पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली आहे आणि यावरून गुन्हा दाखल करून कारवाई करा अशी मागणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली आहे.
पीडित भावरे यांनी पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रार पत्रात असे लिहिले आहे कि, ते फिल्म सिटीत चित्रपट आणि मालिकांचे सेट बनवतात. ते ४ मार्च रोजी दुपारी १ वाजता अप्पू टप्पू मैदानावर गेले आणि त्यांनी बाळूमामाचा सेट तयार केला. दुपारी ते जेवायला बाहेर गेले तिथून परतल्यावर त्यांना सेटवर ड्रेसमॅन करण हा झोपलेला दिसला. त्यामुळे त्यांनी त्याला उठवत सेटवर झोपण्यास विरोध केला. त्यावरून त्यांच्यात हुज्जत सुरू झाली आणि हाणामारी झाली. त्यांचा आवाज ऐकून मालिकेचे दिग्दर्शक बाबासाहेब आणि सहायक दिग्दर्शक समीर हे देखील तेथे आले आणि त्यांनीही भावरेंवर हात उचलला. करणने लोखंडी सळीने त्यांच्या पायावर हल्ला केला. त्यामुळे त्यांचा उजवा पाय मोडल्याचा दावा त्यांनी केला आहे.
https://www.instagram.com/p/CZYcsQON1_x/?utm_source=ig_web_copy_link
माहितीनुसार, भावरे यांनी याप्रकरणी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला तेव्हा आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर जखमी भावरे यांना जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत त्यांनी लिहिले कि, ज्या पोलिसांनी मला रुग्णालयात दाखल केले त्यांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांना अटक करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांची कोणतीही चौकशी अथवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या उलट त्यांनी माझ्याकडूनच तीन ते चार कोऱ्या कागदांवर सह्या करुन घेतल्या. त्यामुळे माझ्यावरील हल्लेखोर तसेच त्यांना मदत करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करत मला न्याय द्यावा, अशी माझी मागणी आहे. याबाबत मी आरेसह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे
Discussion about this post