हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर सुबोध भावेची ‘फुलराणी’ चर्चेत आहे. आधी हि आहे तरी कोण.? यावरून चर्चा सुरु होती आणि आता हि येणार कधी..? यावरून चर्चा आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ‘शेवंता’ होऊन दरवळायला सज्ज झाली आहे. अर्थात आगामी मराठी चित्रपट ‘फुलराणी’मध्ये प्रियदर्शनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिचा अंदाज, बोलायची पद्धत, अतरंगी भाषा सगळं कसं वेगळं असलं तरी मधाळ भासत आहे. तिच्या फर्स्ट लूकनंतर आता या चित्रपटातील भन्नाट सॉंग ‘ब्युटीफुल राणी’ प्रदर्शित झालं आहे.
‘अरं बाला.. बाला.. बाला.. बाला रं तुझ्या जीवाची उडलं दैना’ असे हटके बोल आणि अवधूत गुप्तेसह आनंदी जोशीच्या आवाजाची जोड असलेलं हे गाणं ऐकायला कमाल आहे. या गाण्यातून चित्रपटाचा मुख्य हेतू समोर येत आहे. इतकेच काय तर गाण्यातील प्रियदर्शनीचा ‘शेवंता’ म्हणून जो ऑरा दिसून येत आहे तो कमालीचा लक्षवेधी आहे. गाण्यातला तिचा स्वतःचा प्रेझेन्स खरंच फुलासारखा दरवळतो आहे. या गाण्यात फुलराणीला अंदाज, बाज, जिगर, जिद्द आणि धडाकेबाज तसाच ठसकेबाज पेहलू पहायला मिळतो आहे.
यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अर्थात २२ मार्च २०२३ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात हि ‘फुलराणी’ आपल्या भेटीसाठी येणार आहे. विश्वास जोशी दिग्दर्शित ‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी’चे प्रस्तुतकर्ते विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट आहेत. तर जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत प्रियदर्शनी इंदलकर आणि सुबोध भावे दिसणार आहेत.
त्यामुळे एक वेगळी आणि फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ब्युटीफुल फुलराणी’ या गाण्याआधी ‘हिरवे हिरवे गार गालिचे’ हे गाणे रिलीज झाले होते आणि या गाण्यालाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. आता चित्रपटाला प्रेक्षक किती प्रतिसाद देतात हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
Discussion about this post