हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक ११ ऑक्टोबर १९४२ साली प्रयागराजमध्ये एका बाळाचा जन्म झाला. या बाळालाही माहित नव्हतं कि आज जगभरात त्याचा वाढदिवस इतक्या धुमधडाक्यात साजरा केला जाईल. आजचा दिवस बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीसाठी सुवर्ण दिन आहे. कारण १९४२ साली जन्मलेलं बाळ आज बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज करतंय. अंधेरी रातों में.. सुमसान राहों पर म्हणत… जगाचा भार उचलणाऱ्या कुलीचा पेहराव करणारे.. क्या बात है म्हणत प्रोत्साहित करणारे बिग बी अर्थात बॉलिवूडचे महानायक ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. यानिमित्त जगभरातुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आजचा दिवस बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी भव्य आहे. कारण आजच्याच दिवशी बॉलिवूडमधील महापर्वाचा काळ सुरु झाला होता.
आज अमिताभ यांचा वाढदिवस आहे आणि या निमित्त काही गोष्टी त्यांच्याबद्दल जाणून घेऊया…
तुम्हाला माहित आहे का.. अमिताभ बच्चन यांचं आणि कोलकाताचं एक वेगळंच असं नातं आहे. माहितीनुसार, फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी अमिताभ यांनी कोलकाता येथील एका ब्रिटीश मॅनेजिंग एजन्सीचे एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे. संघर्षाच्या सुरुवातीच्या दिवसांत ब्रिटिश कंपनीत ते काम करत असताना कोलकात्यातील एका मेसमध्ये ते राहत होते आणि तिथेच जेवायचे.
इतकेच नव्हे, तर अमिताभ यांना रुपेरी पडद्यावर काम करण्यासाठी पहिला ब्रेक कोलकातामध्येच मिळाला होता. सन १९६९ मध्ये ‘भुवन शोम’ या बंगाली चित्रपटासाठी एक व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. याशिवाय अमिताभ बच्चन यांची पत्नी म्हणजेच जया भादुरी बच्चन या देखील कोलकाताच्याच. यामुळे अमिताभ यांना बंगालचा ‘जावई’ म्हणूनदेखील ओळखले जाते.
अमिताभ बच्चन यांच्याबद्दल दुसरी खास गोष्ट सांगायची झाली तर.. फॅशन. अमिताभ यांचा फॅशन सेन्स पाहता अनेकदा त्यांना आपण जेंटल लूकमध्येच पाहिले असेल. पण नेहमीच आयकॉनिक फॅशन करणे अमिताभ पसंत करतात. कौन बनेगा करोडपती या शोच्या माध्यमातून ते नेहमीच विविध पद्धतीने डिझाईन केलेल्या सूटमध्ये आपल्याला दिसतात.
त्यांच्या या स्टायलिंगचं श्रेय डिझायनर प्रिया पाटील यांना जाते. दरम्यान फॅशनच्या बाबतीत चुसी अमिताभ यांना ब्लॅक कलर, नेवी ब्ल्यू असे गडद रंग खूप आवडतात. तर ब्राऊन आणि ग्रे कलर अजिबात आवडत नाही. त्यांना वाटत हे कलर त्यांच्या स्किन टोनला मॅच करत नाहीत.
अमिताभ बच्चन यांच्या स्वभावाबद्दल बोलायचे झाले तर ते अतिशय शिस्तप्रिय, मितभाषी आणि तापत प्रवृत्तीचे आहेत. एखादी चुकीची गोष्ट निदर्शनास आली तर अमिताभ यांचा पारा लगेच चढतो. यामुळे अनेकदा ते माध्यमांशी बोलणे टाळतात. अमिताभ यांच्या संघर्षमय काळात त्यांचे बऱ्याचदा वडीलांसोबत वाद होत असे.
एकेवेळी तर संयमाचा बांध असा फुटला कि वादाचं रूपांतर भांडणात झालं आणि अमिताभ नकळत बोलून गेले कि, तुम्ही मला जन्मच कशाला दिला..? यानंतर संतापलेले अमिताभ तर निघून गेले पण त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन मात्र स्तब्ध झाले होते. आपली चूक लक्षात येताच दुसऱ्या दिवशी अमिताभ वडिलांसोबत बोलायला गेले मात्र वडिलांची भेट झाली नाही. पण त्यांनी लिहून ठेवलेली कविता मात्र बिग बींना मिळाली जी आजही त्यांच्यासाठी अतिशय मोलाची वस्तू आहे.
अमिताभ यांची जीवनशैली अतिशय काटेकोर आणि शिस्तबद्ध आहे. कारण अमिताभ यांनी मोठंमोठ्या आजारांचा सामना केलाय. बोललं जातं की त्यांनी टी.बी आणि लिव्हर सिरोसिस सारखे मोठे आजार परतवून लावलेत. अमिताभ यांच्या लिव्हरने ७५ टक्के काम करणं बंद केलं होतं. शिवाय दोनवेळा कोरोनावर देखील त्यांनी मात केली आहे. अमिताभ यांना मायस्थेनिया ग्रोविस ऑटो इम्यून हा आजार देखील आहे. त्यामुळे ते स्वतःच्या शरीराची काळजी घेतात. यासाठी दिवसभराचे ठरलेले रुटीन ते कधीच मोडत नाहीत.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे धुम्रपान वा मद्यपान त्यांच्या जीवनशैलीचा भागच नाही. शिवाय खूप वर्षांपूर्वीच त्यांनी मांसाहार सोडून अतिशय साधे आणि हलके जेवण करण्यास सुरुवात केली. रोजचा वर्कआऊट, योगा, प्राणायम ते नित्य नेमाने करतात. शिवाय रोज २० मिनिटं चालतात. यामुळे आजही वयाची ८० वर्ष होऊनही ते फिट फाईन आणि अतिशय तेजस्वी दिसतात.
तर हि होती बिग बींच्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टींची यादी. शिस्तप्रिय, मृदुभाषी, सकारात्मक व्यक्तिमत्व असणाऱ्या बॉलिवूडच्या महानायक अमिताभ बच्चन यांना ‘Hello Bollywood’ समूहातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Discussion about this post