हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी ४ मध्ये १०० दिवसांचा टप्पा पूर्ण करून टॉप ५ मध्ये आपलं स्थान निश्चित करणारे अभिनेते किरण माने हे सातारा जिल्ह्याची शान आहेत. बिग बॉसच्या घरात शानदार खेळी खेळून त्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले. अगदी टॉप ३ मध्ये जाऊन ट्रॉफीच्या जवळ जाऊन त्यांचा पराजय झाला पण प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिले. साताऱ्यातील प्रेक्षकांनी तर किरण माने याना सातारचा अजिंक्यतारा आणि सातारचा बच्चन अशी नावे दिली. यानंतर जेव्हा किरण माने साताऱ्यात परतले तेव्हा सातारकरांनी मोठ्या गर्दीने त्यांचे स्वागत केले.
बिग बॉस मराठी ४ मध्ये सातारचा बच्चन अशी ओळख निर्माण करणाऱ्या किरण माने यांचं साताऱ्यात एकदम जंगी स्वागत झालं. हार, तुरे, फुलं उधळून, ढोल ताशे वाजवून जंगी मिरवणूक काढून किरण माने यांचं साताऱ्यात चाहत्यांनी स्वागत केलं. यावेळी किरण माने यांची बायको, मुलगा, मुलगी आणि संपूर्ण कुटुंबीय या आलिशान सोहळ्यात सहभागी झाले होते. अनेक महिलांनी किरण माने यांना ओवाळलं, कुणी मिठी मारली, तर कुणी शिट्ट्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या, फटाके फोडले आणि त्यांचे साताऱ्यात स्वागत केले.
या मिरवणुकीत किरण माने यांचे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि साताऱ्यातील तमाम जनता सहभागी झाली होती. यावेळी किरण माने यांनी ओपन जीप मधून हात दाखवत चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. ‘कराल नाद तर व्हाल बाद’ अशा घोषणा करत आणि जोरदार बॅनरबाजीसह हि मिरवणूक झाली.
Discussion about this post