हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सध्या राजकीय वर्तुळाचं केंद्रबिंदू झाला आहे. काही राजकीय पक्ष चित्रपटाचे समर्थन करत आहेत. तर काहीं विरोध. भाजपने या चित्रपटाला पाठिंबा दर्शवत म्हटले कि, हा सिनेमा म्हणजे काश्मीरी पंडितांवर झालेल्या अन्यायाचा ज्वलंत इतिहास. दरम्यान विधीमंडळ अधिवेशनात भाजप आमदाराने ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करा, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे ‘द काश्मीर फाईल्स’बाबत भाजपने अवाक्षरदेखील काढू नये, असं म्हणत ब्राह्मण महासंघाने भाजपला सक्त ताकीद दिली आहे. यात वाजपेयी पंतप्रधान असताना त्या ५ वर्षांत आणि नरेंद्र मोदी यांच्या ७ वर्षांच्या काळात भाजपने काश्मीरी पंडितांसाठी काय केलं? असा सवालदेखील ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे.
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून ब्राह्मण महासंघाने भाजपला चांगलेच फटकारले आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाबाबत भाजपने अवाक्षर काढू नये. भाजपवाल्यांनो, खोटं- खोटं रडू नका. हिंदुत्व हिताचं उसणं अवसान आणू नका. ‘द काश्मीर फाईल्स’चं स्वागत करताय पण ही घटना घडली तेव्हा केंद्रात तुमचंच सरकार होतं, VP सिंग तुमच्याच पाठिंबावर पंतप्रधान होते. अतिरेक्यांना तुम्हीच परत सोडलं, तेही पैसे देऊन! ज्या राज्यपालांच्या देखरेखीखाली हे हत्याकांड घडलं त्या जगमोहन यांना तुम्हीच राज्यपाल बनवलं, हे आम्ही विसरलेलो नाही. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या ५ वर्षांच्या काळात आणि नरेंद्र मोदी यांच्या ७ वर्षांच्या काळात भाजपने काश्मीरी पंडितांसाठी काय केलं? काश्मीरी पंडितांवर अन्याय ही भाजपची चूक आहे, असं ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट काश्मिरी पंडितांचे काश्मीर मधून स्थलांतर का झाले याचे भाष्य करतो. हा चित्रपट एका सत्य कथेवर आधारित आहे. काश्मिरी पंडितांनी सहन केलेल्या अत्याचारांचे भाष्य या चित्रपटातून करण्यात आले आहे. या चित्रपटात ब्रह्मा दत्तच्या भूमिकेत मिथुन चक्रवर्ती, पुष्करनाथच्या भूमिकेत अनुपम खेर, कृष्णा पंडितच्या भूमिकेत दर्शन कुमार, राधिका मेननच्या भूमिकेत पल्लवी जोशी, श्रद्धा पंडितच्या भूमिकेत भाषा सुंबली, फारूक मलिक हे कलाकार एकत्र पडद्यावर पहायला मिळणार आहेत.
Discussion about this post