हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘कॅप्टन इंडिया’ या आगामी चित्रपटासोबत आरएसवीपी आणि बावेजा स्टूडियोज इतिहासातील यशस्वी बचाव मोहिमांपैकी एक मोहीम रुपेरी पडद्यावर आणण्यास सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचे कथानक एका सत्य घटनेवर आधारित असून भारताच्या सर्वात मोठ्या बचाव मोहिमेवर संपूर्णतः आधारित आहे. मुख्य म्हणजे, राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक हंसल मेहता यांच्याद्वारे या चित्रपटाचे दिग्दर्शन केले जाणार आहे. तर रोनी स्क्रूवाला व हरमन बावेजाद्वारे निर्मिती केली जाणार आहे. शिवाय या चित्रपटातील मुख्य भूमिकेत अभिनेता कार्तिक आर्यन झळकणार आहे. त्याचा पायलट लूक नुकताच प्रेक्षकांसमोर आला असून त्याला चांगलीच पसंती मिळत आहे.
विशेष असे कि, हा चित्रपट एक्शन आणि ड्रामाने परिपूर्ण आहे. शिवाय यात कार्तिक एका शूर आणि साहसी पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. या विषयी बोलताना अभिनेता कार्तिक आर्यन म्हणाला की, ‘कॅप्टन इंडिया’ एकाच वेळी प्रेरणादायक आणि रोमांचकारी चित्रपट आहे आणि त्याच्यासोबत मला आपल्या देशाच्या अशा एका ऐतिहासिक अध्यायाचा भाग बनता आले, हा माझा सन्मान असून याचा मला अभिमान आहे.
हंसल सरांच्या कामाप्रति माझ्या मनात खूप आदर असून त्यांच्यासोबत काम करण्यासाठीची ही योग्य संधी आहे.” अशा भावना व्यक्त करत आपण या चित्रपटाबाबत उत्सुक असल्याचे त्याने म्हटले आहे.
या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक हंसल मेहता म्हणाले, “‘कॅप्टन इंडिया’ सत्य घटनेपासून प्रेरित असून एका अशा घटनेला चित्रित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आपले दुःख आणि वेदना बाजूला सारून हजारो लोकांचे प्राण वाचवतो. मला या चित्रपटासाठी रोनी स्क्रूवाला आणि हरमन बावेजा यांच्यासोबत काम करण्याचा आनंद आहे आणि मी कार्तिकसोबत काम करण्यासाठी उत्साहित आहे.” रोनी स्क्रूवाला आणि हरमन बावेजा यांच्याद्वारे निर्मित, बावेजा स्टूडियोजचे विक्की बाहरी यांची सह-निर्मिती असलेल्या या चित्रपटामध्ये आरएसवीपीतर्फे सोनिया कंवर एसोसिएट प्रोड्यूसर म्हणून काम करत आहेत. ‘कॅप्टन इंडिया’चे चित्रीकरण पुढील वर्षाच्या सुरुवातीस सुरू होणार आहे.
Discussion about this post