हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यानंतर ती प्रचंड मानहानीस सामोरी जात आहे. दरम्यान शिल्पा आणि तिच्या कुटुंबाने कथित मानहानीकारक अहवालांबाबत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाने तिच्या अर्जात व्यक्त केलेल्या गोपनीयतेच्या अधिकाराला मान्यता दिली आहे. न्यायालयाने म्हटले, अभिनेत्रीच्या गोपनीयतेच्या अधिकाराची बाब योग्य आहे. कोणत्याही व्यक्तीवर किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना येणाऱ्या समस्यांवर भाष्य करू शकत नाही.
याआधी सुनावणी दरम्यान न्यायालयाने म्हटले होते की, अभिनेत्रीविरुद्ध रिपोर्टिंग करणाऱ्या वृत्तवाहिन्यांना रोखण्याचा आदेश जारी केल्याने प्रेसच्या स्वातंत्र्यावर विपरित परिणाम होईल, त्यामुळे न्यायालय ते थांबवू शकत नाही. यानंतर आता न्यायालयाने एक निवेदन जारी करीत म्हटले आहे की, ‘कोणतेही न्यायालय असे म्हणू शकत नाही की, एखादी व्यक्ती पब्लिक फिगर असल्याने त्यांना त्यांचा गोपनीयतेचा अधिकार मिळणार नाही. मुक्त बोलण्याचा अधिकार म्हणजे एखाद्याचा गोपनीयतेचा अधिकार संपवणे असा होत नाही.’ न्यायालयाने असेही म्हटले आहे की, प्रेसच्या स्वातंत्र्यामुळे तपासासंदर्भातील अहवाल थांबवता येत नाही. शिल्पाच्या अर्जानंतर काही लेख आणि व्हिडीओ काढण्यात आले असले, तरी न्यायालय सर्व लेख काढू शकत नाही.
राज कुंद्रा प्रकरणी शिल्पाने सोमवारी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. हे निवेदन तिने सोशल मीडियावरही आपल्या भावनास्वरूप शेअर केले आहे. यात तिने लिहिले कि, ‘होय, अलीकडचे काही दिवस आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होते. अनेक अफवा आणि आरोप झाले आहेत. माध्यमांनी माझ्यावर बरेच अन्यायकारक आरोप केले आहेत. केवळ मीच नाही तर माझ्या कुटुंबाला ट्रोल केले जात आहे आणि आमच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मी अद्याप या प्रकरणावर टिप्पणी केली नव्हती आणि भविष्यात मी असे करणार नसल्याने कृपया अशा खोट्या गोष्टी पसरवू नका. मला एवढेच सांगायचे आहे की तपास अजून चालू आहे आणि माझा मुंबई पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.’ ‘एक कुटुंब म्हणून, आम्ही सर्व उपलब्ध कायदेशीर उपायांचा अवलंब करत आहोत. पण मला तुम्हाला पुन्हा विनंती करायची आहे, एक आई म्हणून, माझ्या मुलांच्या गोपनीयतेची काळजी घ्या आणि अर्धवट माहितीसह टिप्पणी करू नका.’
Discussion about this post