हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ या धमाल विनोदी चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आज या चित्रपटाचा पुढील भाग प्रदर्शित झाला आहे. आज दिनांक १६ ऑगस्ट २०२२ रोजी ‘बॉईज ३’ हा चित्रपट रिलीज झाला असून धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर या त्रिकुटाने आपली जादू पुन्हा एकदा दाखवली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी तुफान पावसाच्या सारी कोसळत असतानाही अनेक प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला आहे. अनेकांनी चित्रपटाला आपली विशेष पसंती दिली आहे. मात्र या चिपटातील एका संवादाने रोष ओढवून घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बॉईज ३’मध्ये पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतीक लाड यांच्यासोबत विदुला चौघुले देखील दिसते आहे. या तिसऱ्या भागात विदुलाने साऊथ इंडियन तडका आणला आहे. विनोदी आणि तरुणांच्या विषयवार आधारलेल्या या चित्रपटाला एकीकडे महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळतोय तर बेळगावात मात्र विरोध जपू लागला आहे. ‘बॉइज ३’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला कर्नाटक रक्षण वेदिके संघटनेने आपला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यामुळे हा चित्रपट बेळगावात काही प्रदर्शित होऊ शकलेला नाही. या संस्थेने चित्रपटातील काही संवादांवर आक्षेप घेतला आहे. यामध्ये कन्नड भाषा, कर्नाटक पोलीस यांचा अवमान होण्यासारखे संवाद आहेत असा आरोप या संघटनेने केला आहे.
बेळगावात प्रकाश आणि ग्लोब या चित्रपटगृहात आज १६ सप्टेंबर शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, या संघटनेच्या विरोधी भूमिकेमुळे हे प्रदर्शन रोखण्यात आलं. या चित्रपटात एका दृश्यात पोलीस स्थानकात आलेल्या या बॉईजना पोलीस अधिकारी म्हणतो कि, ‘नो मराठी, ओन्ली इंग्लिश, इलदिद्र कन्नड’. यावर कबीर पोलीस अधिकाऱ्याला म्हणतो कि, ‘साहेब जर तुम्हाला तुमच्या भाषेचा माज करता येतो, तर आम्हाला आमच्या भाषेची लाज राखता येते. मराठी भाषेचा माज बेळगावात दाखवायचा नाही, तर कुठे दाखवायचा?’.
याच संवादाला कर्नाटक रक्षण वेदिकेचा आक्षेप असून यामुळे सामाजिक शांतता भंग होऊ शकते असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ‘बॉइज ३’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, अशी मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेने पोलीस आयुक्तांकडे केली आहे. या एका वादाच्या ठिणगीमुळे बेळगावात कानडी मराठी वाद पुन्हा उफाळला आहे.
Discussion about this post