हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी नाट्यसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले हे नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. नाटक, मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना गेल्या तीन दशकांहून अधिक काळ दामलेंनी गाजवला आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी जी कारकीर्द गाजवली आहे त्यासाठी विविध पुरस्कारांनी नेहमीच दामलेंना सन्मानित केले जाते. यानंतर आता प्रशांत दामले याना ‘ब्राह्मण भूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना आम्ही सारे ब्राह्मण व ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका या नियतकालिकांच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा ‘ब्राह्मण भूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. याबाबतची माहिती या नियकालिकेचे संपादक भालचंद्र कुलकर्णी आणि संचालक संजय ओर्पे यांनी दिली आहे. माहितीनुसार, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे त्यांना डी. लिट ही पदवी मिळाली आहे आणि या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार जाहीर करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मानपत्र, पुणेरी पगडी आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
याशिवाय समारंभामध्ये प्रसिद्ध मुलाखतकार राजेश दामले हे अभिनेते प्रशांत दामले यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. येत्या शनिवारी, दिनांक ६ मे २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता मॉडर्न कॉलेज सभाग़ृह, शिवाजीनगर येथे हा समारंभ पार पडणार आहे. या समारंभात ‘इंदुमती- वसंत करिअर भूषण पुरस्कार’ साहित्यिक व पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांना, डॉ. रामचंद्र देखणे युवा कीर्तनकार पुरस्कार मानसी बडवे यांना आणि ‘भगवान परशुराम ब्राह्मण संस्था पुरस्कार’ देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, पुणे या शतकमहोत्सवी संस्थेला देण्यात येणार आहे. रोख बक्षिस, शाल व सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकृष्ण चितळे (अध्यक्ष, महाराष्ट्र चित्पावन संघ) तर डॉ. गजानन एकबोटे (कार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी) हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत.
Discussion about this post