हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. गेल्यावर्षभरापासून या विषाणूने आपली पकड दिवसेंदिवस घट्ट केल्याचे दिसत आहे. कोरोनाचे संकट संपता संपत नाहीये. परिस्थिती नियंत्रणात येते ना येते तोच पुन्हा एकदा या विषाणूने आपला जम बसविला आहे. सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून कोरोना बाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता महाराष्ट्र सरकारने अनेक निर्बंध लावले आहेत. परिणामी याचा संपूर्ण ताण पोलिस यंत्रणेवर आला आहे. दिवस रात्र काम करणाऱ्या पोलिसांवरचा कामाचा ताण पाहता शहरातील व्हॅनिटी व्हॅन मालकांनी त्यांची ही व्हॅन मुंबई पोलिसांच्या सेवेत देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
पोलिसांना त्यांच्या कामातून काही क्षणांची का असेना विश्रांती मिळावी, तसेच कपडे बदलणे आणि शौचालयाच्या सुविधेसाठी या व्हॅनिटी व्हॅन त्यांना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत जवळपास चार व्हॅनिटी व्हॅन पोलिसांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. दहिसर, दिंडोशी, मालाड आणि घाटकोपर या भागांमध्ये या व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत. पुढील काळात पोलिसांच्या गरजेनुसार अधिकाधिक व्हॅनिटी व्हॅन पुरवण्याचा विचार करण्यात आला आहे.
पोलिसांनाही त्यांच्या दिवसभरातील खाजगी बाबींसाठी वैयक्तिक स्पेस मिळावी, यासाठी व्हॅनिटी व्हॅन कमालीची उपयोगी पडत आहे. व्हॅनिटी व्हॅनच्या मालकांनी हा निर्णय घेऊन पोलिसांसाठी विसाव्याची सुविधा उपलब्ध केल्याचे दिसून येत आहे. या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. तसेच पोलिसांसाठी काहीतरी चांगले काम करण्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाची सर्व स्तरांवरून सराहना होत आहे. कालपर्यंत ज्या व्हॅनिटी व्हॅन रील आयुष्यातील हिरोंसाठी उपयोगी होत्या, आज त्याच रिअल आयुष्यातील हिरोंसाठी कामी येत आहेत.
Discussion about this post