हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट मोठ्या प्रमाणात वादात अडकल्याचे दिसून आले. या चित्रपटातील ‘बेशरम गाणे’ रिलीज झाल्यानंतर त्यातील अभिनेत्रीने परिधान केलेली बिकिनी भगव्या रंगाचीच का..? असा वाद सर्वत्र उफाळला होता. दिवसेंदिवस हा वाद वाढू लागल्याने चित्रपटाचे भविष्य धोक्यात आले होते. यातच आता चित्रपटाबाबत काही मोठे निर्णय घेतले गेले आहेत. सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटात काही विशेष बदल करण्याचे सुचविण्यात आले आहे.
शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रासाठी हा चित्रपट पाठवला गेला असता सर्वत्र सुरु असलेल्या वादामुळे सेन्सॉर बोर्डाच्या समितीने निर्मात्यांना या चित्रपटात काही बदल सुचवले आहेत. ज्यामध्ये या चित्रपटावर वाद ओढवून घेणाऱ्या ‘बेशरम रंग’ या गाण्याचाही समावेश आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी सूचित केलेले मुख्य बदल केलेले चित्रपटाचे व्हर्जन समितीकडे सुपूर्द करण्याचीदेखील सूचना यावेळी देण्यात आली आहे. ‘सेन्सॉर बोर्ड हे नेहमीच कल्पकता आणि लोकांची संवेदनशीलता यात योग्य ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करते. तुम्ही या मुद्द्यांवर योग्य उत्तर शोधाल असा आम्हाला विश्वास आहे’, असे सेन्सॉर बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
यामुळे आता ‘पठाण’ चित्रपटाला वादाच्या भोवऱ्यात गोवणारे ‘बेशरम रंग’ या गाण्यातील दीपिकाच्या बिकीनीचा रंग बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान का केली..? भगव्या रंगाची बिकिनी घालून बोल्ड दृश्ये देऊन तिने सनातन धर्माचा अपमान केला आहे, असे आरोप विविध हिंदू संघटनांनी केले होते. दरम्यान या गाण्यामुळे दीपिका आणि शाहरुख याना ट्रोलिंग आणि हिंदू संघटनांचा रोष पत्करावा लागला आहे. ही दृश्ये बदलली नाही तर चित्रपटावर बहिष्कार घालण्याचा इशारा देखील संघटनांनी दिला होता. या चित्रपटात शाहरुख, दीपिका यांच्यासह जॉन अब्राहमदेखील मुख्य भूमिकेत आहे. सिद्धार्थ आनंद याचे दिग्दर्शन आणि यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत ‘पठाण’ची निर्मिती करण्यात आली आहे.
Discussion about this post