हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भांडारकर एंटरटेन्मेंट, पराग मेहता प्रस्तुत आणि आकाश पेंढारकर दिग्दर्शित ‘सर्किट‘ हा मराठी चित्रपट काल शुक्रवारी ७ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित झाला. नावाप्रमाणे या चित्रपटाचे कथानक एका सर्किट व्यक्तिमत्वावर आधारलेले आहे. लहान सहान गोष्टींवर डोक्यात तिडीक जाणाऱ्या एका तरुणाची हि गोष्ट आहे. ज्यामध्ये ॲक्शन आहे, रोमांस आहे, थ्रिल आहे. पण तरीही कुठेतरी कमी आणि अपुरा वाटतो. (Circuitt Marathi Movie Review) एकंदरच हा चित्रपट पहायला बसलं तर फार उत्सुकता दाटलेली असते आणि जसा जसा तो सुरु होतो, कथानक समजू लागत कुठेतरी अपेक्षा भंग होत असल्याची जाणीव होते. स्पष्ट सांगायचं झालं तर, लेखक संजय जमखंडी यांनी हि कथा आणि कथेतील पात्र शक्य तितके रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र असे असूनही लेखकाला आणि दिग्दर्शकाला तेव्हढ्या ताकदीने हि गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहचवता आलेली नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
(Circuitt Marathi Movie Review) हा चित्रपट म्हणजे एक असा खेळ आहे जो खेळण्यात रस आहे मात्र खेळताना कंटाळा आल्याने बिघडला. ज्यामुळे चित्रपट पाहताना प्रेक्षक खुर्चीत खिळून राहणं जरा अवघडंच!! मुख्य म्हणजे ‘सर्किट’ हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘काली’ या मल्याळम चित्रपटाचा मराठी रिमेक आहे. ‘काली’ या चित्रपटात अभिनेता दुलकर सलमान आणि अभिनेत्री साई पल्लवी यांची जबरदस्त केमिस्ट्री पहायला मिळाली होती. तर मराठी रिमेकमध्ये अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे यांची फ्रेश जोडी पहायला मिळाली. मुळात दोन्ही सिनेमाचे कथानक सारखे असले तरीही यात काहीसे बदल दिसून येतात आणि तरीही मूळ सिनेमा रिमेकवर भारी पडतोय. त्यामुळे तुलना नकोच.
एकीकडे ‘काली’ हा सिनेमा युट्युब, ओटीटीवर उपलब्ध असल्यामुळे अनेक प्रेक्षकांनी तो पाहिला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे साहजिकच हा चित्रपट पाहून मराठी रिमेक पाहणाऱ्या प्रेक्षकाला भ्रमनिरास म्हणजे काय याची चांगलीच प्रचिती येईल. अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘वेड’ हा चित्रपटदेखील दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक होता. मात्र या मराठी रिमेकचा प्रेक्षकांवर चांगलाच प्रभाव पडल्याचे आपण पाहिले. असा प्रभाव ‘सर्किट’चा पडणे तेव्हढे कठीणच. (Circuitt Marathi Movie Review) मराठी सिनेविश्वातील वाढते रिमेक पाहून पुढे जाऊन मराठी लेखक कॉपी पेस्टच्या नादी लागले नाही, म्हणजे मिळवलं. कारण कोणत्याही भाषेतून चित्रपटाचा रिमेक बनवायचं म्हटलं तर मूळ स्थानिक भाषेपासून, वारसा, भिन्नता अशा प्रत्येक बाबींकडे लक्ष केंद्रित करावं लागत. ज्यामध्ये कुठेतरी रिमेक बनवताना दुर्लक्ष केलं जात आणि मग चित्रपट गंडतो.
आता ‘सर्किट’च्या कथानकाबद्दल सांगायचं झालं तर, चित्रपटात ‘सिद्धार्थ मोहिते’, ‘आरोही प्रधान’, ‘सरकार’ आणि ‘रंगा’ हि पात्र मुख्य आहेत. सरकार हा एक असा गुंड आहे. तर सिद्धार्थ एक असा तरुण आहे ज्याचा रागावर ताबा नाही. आरोही एक असे पात्र आहे जिच्या गळ्यात देवी सरवस्ती वसते. तर रंगा ना गुंड आहे ना ऍक्शन व्हिलन. पण तरीही भाव खाऊन जातो. (Circuitt Marathi Movie Review) सुरुवातीलाच एका ढाब्यावर सरकार आपलं राज्य प्रस्थापित करताना दिसतो. मग थेट सिद्धार्थकडे स्टोरी वळते. जिथे कॉलेज, राडा, राजकारण, मारामारी आणि युथ फेस्टिवल ते प्रेमप्रकरण असं वारं वाहताना दिसतं. चटकन राग येणार सिद्धार्थ आरोहीच्या प्रेमात पडतो. मग त्यांचा संसार सुरु होतो आणि या सुखी संसाराला सिद्धार्थच्या रागामुळे गालबोट लागतं. उत्तरार्धात सिद्धार्थ आणि आरोहीचं भांडण प्रेक्षकांना गदागदा हलवून जाग करेल.
(Circuitt Marathi Movie Review) पुढे, भांडण विकोपाला जातं आणि आरोही घर सोडते, माहेरी निघते. यानंतर सिद्धार्थ आणि आरोही दोघेही सरकार तसेच रंगाच्या तावडीत सापडतात. कथेतील हे वळण काही क्षणासाठी अपेक्षा वाढवतं. कसे..?, कुठे..?, का..? या प्रश्नांची उत्तरे थिएटरमध्ये मिळतील. पण हि चौकटीची खेळी कथानकाचा मसाला आहे. त्याची चव चाखण्यासाठी हा चित्रपट पहायला तशी काही हरकत नाही. यात शंकाच नाही कि चित्रपटातील प्रासंगिक विनोदसुद्धा सपशेल फसले आहेत. कथानकात जो ठेहराव आणि थरार अपेक्षित होता तो नक्कीच यात नाही. चित्रपटाचा रटाळपणा घालवण्यासाठी त्यामध्ये फ्रेश काय आहे..? असे म्हटले तर चित्रपटाची गाणी असे उत्तर असेल.
चित्रपटातील गाण्यांचे बोल, संगीत अतिशय चांगले आहे. प्रसंगातील ताण आणि भावना दर्शविण्यासाठी चित्रपटाचे पार्शवसंगीत अत्यंत मदतयुक्त ठरत आहे. बुडत्याला काठीचा आधार तसे सर्किट’ला संगीताचा असे म्हणता येईल. चित्रपटातील गाण्यांचे बोल हे मंगेश कांगणे, आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांनी रचलेले आहेत. तर संगीत अभिजीत कवठाळकर यांनी दिले आहे. तसेच गाण्यांना सोनू निगम, अवधूत गुप्ते आणि बेला शेंडे यांसारख्या मुरलेल्या गायकांचे श्रवणीय स्वर लाभले आहेत. शिवाय पार्श्वसंगीताचे शिवधनुष्य आदित्य बेडेकर यांनी प्रभावीपणे पेलले आहे. (Circuitt Marathi Movie Review)
आता कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेता वैभव तत्त्ववादीने साकारलेला तापट, सनकी किंवा चित्रपटाच्या भाषेतला सर्किट हा काहीसा पटला नाही. सिद्धार्थ पात्रातील वास्तविकता कुठेतरी धुरकट झाल्यासारखे वाटते. शिवाय काही ठिकाणी हि व्यक्तिरेखा दामटवण्याचा प्रयत्न केल्यासारखा वाटतो. काही ठिकाणी वैभववर सिद्धार्थ लादला गेलाय का काय..? असेही वाटते. पण आता यात कलाकाराची चूक ती काय..? असो, या उलट अभिनेत्री हृता दुर्गुळेने साकारलेली आरोही कुठेतरी ‘ये अच्छा है।’ असा फील देते. सालस, सौम्य, पेचात अडकली असता घाबरलेली आणि आत्म रक्षणासाठी धडपडणारी ‘ती’ भूमिका आणि ‘ती’चे मूळ रंग पकडण्यात हृताला बरेचसे यश आले आहे. (Circuitt Marathi Movie Review)
शिवाय चित्रपटात सरकार या गुंडाची भूमिका साकारत अभिनेते रमेश परदेशी यांनी मैदान राखलं आहे. तिरकस, कुचकट आणि तरीही लक्षवेधी अशी भूमिका रमेश परदेशी यांनी साकारली आहे. (Circuitt Marathi Movie Review) त्यामुळे हे पात्र निगेटिव्ह असलं तरीही प्रेक्षकांना आवडेल अशी खात्री वाटते. तसेच ‘रंगा’ हे पात्र कोणत्याही संवादाशिवाय साकारणारे अभिनेते मिलिंद शिंदे थेट डोळ्यातून प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत.
(Circuitt Marathi Movie Review) हालचाली आणि हावभाव इतकेच माध्यम राखत मिलिंद शिंदे यांनी ‘रंगा’ या भूमिकेच्या एकूण एक छटा उत्तम सादर केल्या आहेत. चित्रपटाच्या मध्यान्हानंतर हि निगेटिव्ह पात्र कथेत जीव ओतताना दिसतात. त्यामुळे भले हा चित्रपट सलाम ठोकण्यासारखा नसेल पण टाळी वाजवण्यासारखा नक्की आहे. त्यामुळे क्षणिक मनोरंजन इतकाच हेतू असेल तर हा चित्रपट पहायला हरकत नाही.
Discussion about this post