हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोना काळानंतर सिनेसृष्टीची गाडी जरा कुठे रुळावर आली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये २ वर्ष वाया गेलेला काळ मनोरंजन सृष्टी भरून काढण्याच्या प्रयत्नात आहे. साहजिकच झगमगाटीचे क्षेत्र असणाऱ्या कला क्षेत्राकडे पाहताना आपल्याला कायम त्यामागील झगमगाटच दिसतो. मात्र कलाकारांच्या व्यथा त्यांचे प्रश्न हे काही केल्या दिसत नाहीत. समजत नाहीत. तेच जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चक्क ‘मला तुमचं ऐकायचं आहे’ असं म्हणत मराठी कलाकारांशी संवाद साधला आहे. यावेळी अनेक नवे जुने दिग्गज कलाकार मंडळी उपस्थित होते. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले, अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक सचिन पिळगावकर, अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेते विजय पाटकर, निर्माते विद्याधर पाठारे, अभिनेते पुष्कर श्रोत्री हे प्रतिनिधीक स्वरूपात कला क्षेत्रातील समस्या मांडण्यासाठी उपस्थित होते.
‘मला तुमचं ऐकायचं आहे’ म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रातील नव्या- जुन्या कलाकारांशी संवाद साधला. यावेळी अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. शिवाय मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्वाच्या बाबींवर बारकाईने लक्ष देऊ आणि मराठी सिनेसृष्टीला गतवैभव प्राप्त करुन देऊ असे आश्वासन कलाकारांना दिले. या भेटीचा आशय आणि अनुभव सांगणारी एक पोस्ट मराठी अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रसाद ओक याने शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये काही फोटो शेअर करत प्रसादने लिहिले आहे कि, ‘मला तुमचं ऐकायचं आहे’ असं म्हणत काल मा.ना.मुख्यमंत्री श्री.एकनाथ जी शिंदे यांनी नाटक,मालिका, आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रातल्या अनेक लोकांशी वार्तालाप केला. अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडले गेले. आमच्या अनेक अडचणी त्यांनी ऐकून घेतल्या. शासकीय पातळीवर संपूर्ण मराठी कलासृष्टीसाठी कालचा संवाद खूपच महत्वाचा ठरेल अशी आशा वाटते. इतक्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आमचं ऐकल्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचे मनःपूर्वक आभार.या उपक्रमाचं आयोजन केल्याबद्दल आमचे मित्र सचिन जोशी, विजू माने, आणि मंगेश देसाई यांचेही खूप आभार…!!!’
यावेळी मराठी सिनेसृष्टीशी निगडीत अनेक विषयांवर लक्ष दिले गेले. शिवाय काही विषयांवर सखोल चर्चा करून त्याबाबतीत निर्णयही झाले. यांपैकी काही महत्वाच्या निर्णयांची नोंद खाली करीत आहोत.
- या बैठकीत मराठी चित्रपटांना GST मधून सूट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
- ज्येष्ठ मराठी कलाकारांना योग्य मानधन योजना सुरु करण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याचे आश्वासन देण्यात आले.
- दादासाहेब फाळके चित्रनगरीवर लक्ष केंद्रित करीत चित्रनगरीतील रस्ते, प्रवासी वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा, सुरक्षा आणि स्वछता अशा अनेक बाबी तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने पावले उचलण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
- विनामूल्य वैद्यकीय सुविधा, ज्येष्ठ कलाकरांना सेटवर राबणाऱ्या तंत्रज्ञांना, वादकांना विमा संरक्षण याबाबतही लवकरच निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
- चित्रनगरीला भेट देऊन पाहणी केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. यामुळे आता मराठी सिनेसृष्टीत काही आवश्यक बदल लवकरच घडून येतील अशी आशा आहे.
Discussion about this post