हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कॉमेडीचं टायमिंग ठेवून प्रेक्षकांना हसवणे इतके सोप्पे नाही. मात्र हे काम अगदी जबाबदराने पार पाडणाऱ्या एका अवलियाने आज जगाचा निरोप घेतला आहे. तामीळ सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विवेक यांचे आज सकाळी निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. शुक्रवारी वडापलानी येथील सीम्स येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पार पडली. या शस्रक्रियेनंतर त्यांची तब्येत अत्यंत खालावली. दरम्यान त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेरीस त्यांनी आज सकाळी ४.३५ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी बेशुद्धावस्थेतच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना त्रास होत असल्याने पत्नी आणि मुलीने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. विवेक यांनी गुरुवारीच कोरोनाची लस घेतली होती. पण त्यांच्या मृत्यूचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. डॉ. राजू सीवास्मी यांनी सांगितले की, हृद्यविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची तब्येत अचानक बिघडली. यामुळे त्यांनी गुरूवारी घेतलेल्या कोरोना लसीचा त्यांच्या निधनाशी काहीही संबंध नाही. त्यांना रक्तदाबाचा त्रास होता. रुग्णालयात आल्यावर त्यांच्या सगळ्या टेस्ट केल्या होत्या. त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याची खातरजमा झाली होती.
तामीळनाडूतील कोवीलपट्टीमध्ये विवेक यांचा जन्म झाला होता. त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक आणि लेखक म्हणून सिनेसृष्टीतील करियरला सुरुवात केली होती. के भालचंद्र यांच्यासोबत त्यांनी सुरुवातीच्या काळात काम केले होते. त्यांच्या कॉमिक टायमिंगने प्रभावित होऊन मनाथील उरुडी वेंडम या चित्रपटात के भालचंद्र यांनी त्यांना छोटीशी भूमिका साकारण्याची संधी दिली.
https://www.instagram.com/p/CNwIWbxJkGD/?utm_source=ig_web_copy_link
त्यानंतर पुथू पुथू अर्थंगल या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन केले. यानंतर ते एक कॉमिक अभिनेता म्हणूनच ओळखले जाऊ लागले. पुढे २००९ साली त्यांना पद्मश्री पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते. विवेक यांच्या निधनाने तामिळ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
Discussion about this post