हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सिजनमधून काळ आणखी एक सदस्य बाहेर पडला. ज्याचं नाव आहे त्रिशूल मराठे. एक कॉमन मॅन अर्थात सामान्य माणूस म्हणून सामान्य प्रेक्षकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्रिशूल मराठे बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वत दाखल झाला होता. यानंतर तो चांगला खेळताना दिसला. पण गेल्या काही दिवसांपासून त्याचा खेळातील रस जणू नाहीसा झाला होता. त्यामुळे काही दिवसांपासून तो कोणत्याच वादात वा चर्चेत सक्रिय दिसला नाही आणि परिणामी त्याला बिग बॉसचा निरोप घ्यावा लागला.
लाइमलाईटशी काहीही संबंध नसलेला त्रिशूल मराठे जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हा अनेकांना त्याच्या एव्हिक्शनचे दुःख तर अनेकांना आतल्या आता आनंद झाला. मात्र शो होस्ट महेश मांजरेकर म्हणाले कि, ‘एका चांगल्या माणसाला घराबाहेर जावं लागत आहे. तुझ्यासारखा लकी प्रेक्षक बिग बॉसच्या घराचा सदस्य झाला याचा मला आनंद झाला होता.’ मांजरेकरांच्या बोलण्यावरून एकंदरच त्रिशूल मराठे आता काही सामान्य प्रेक्षक राहिलेला नाही हे आपल्या लक्षात आले असेलच. सामान्य ते सेलिब्रिटी असा एक वेगळा प्रवास त्रिशुलने बिग बॉसच्या माध्यमातून केला आहे.
त्रिशूल मराठे याला अभिनयाची आवड असल्याचे त्याने शोमध्ये बोलून दाखवले होते. त्यामुळे आता आगामी आयुष्यात सामान्य माणूस असामान्य अभिनेता होतो का..? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तसेच आता त्रिशुलचं आयुष्य कसं असेल..? याबाबतही अनेकांना उत्सुकता असेल. एअरटेल लकी कॉलरच्या माध्यमातून त्रिशूल मराठे हा बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा स्पर्धक झाला होता. बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यात मांजरेकरांचं मन जिंकणारा त्रिशूल दुसऱ्या आठवड्यात गायब झाला आणि या आठवड्यात घरातून बाहेर. असेच एक एक स्पर्धक बिग बॉसच्या खेळातून आऊट होताना दिसतील आणि शेवटी उरेल फक्त एक जो ठरणार बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता.
Discussion about this post