हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत हिला ट्विटरवर वाचाळ वक्तव्य करणे चांगलेच भोवत आहे. तिचे असेच एक ट्विट आता तिच्या अडचणीत वाढ करणार आहे. 73 वर्षीय मोहिंदर कौर यांनी कंगनाविरोधात आता बठिंडा (पंजाब) येथे मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंगना रणौतने शेतकरी आंदोलनाविरोधात मत मांडताना अनेक ट्विट्स केले होते. त्यावेळी कंगनाने मोहिंदर कौर यांची तुलना दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनात सहभागी होणा-या 90 वर्षीय बिलकीस दादीसोबत केली होती. तसेच त्यांच्या विरोधात अपमानजनक टिप्पणी केली होती.
कौर यांचे वकील रघुबीर सिंह यांनी शुक्रवारी सांगितलं की, भारतीय दंड संहितेच्या कलम 499 (मानहानी) आणि कलम 500 (मानहानीची शिक्षा) अंतर्गत तक्रार दाखल केली गेली आहे. या तक्रारीची सुनावणी 11 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती कौर यांच्या वकिलांनी दिली. पंजाबमधील 73 वर्षीय महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, कंगनाने आपली तुलना एका वेगळ्या महिलेशी करून ट्विटमध्ये ‘खोटे आरोप आणि टिप्पण्या’ केल्या आहेत. कंगनाच्या मते ही वृद्ध महिला तिच महिला आहे, जी शाहीन बाग अंदोलनात सहभागी झाली होती.
कौर यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला की, ‘अशाप्रकारची प्रतिक्रिया देऊन अभिनेत्रीनं माझी प्रतिष्ठा कमी केली आहे. चूकीच्या आणि अपमानजनक ट्विटमुळे आपल्याला मानसिक ताण, वेदना, छळ, अपमान आदी गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे. बहादूरगड जांदिया गावात राहणारी कौर म्हणाल्या की, राणौत यांनी अद्याप बिनशर्त माफीही मागितलेली नाही.
कंगनाने कौर यांचा उल्लेख बिल्कीस बानो असा केला होता. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीच्या शाहिनबागमधील आंदोलनाच्या आयकॉन बनलेल्या बिल्कीस बानो या मध्यंतरी चर्चेत आल्या होत्या. टाइम मॅगझीनने जगातील प्रभावशाली 100 महिलांमध्ये त्यांचा समावेश केला होता. कंगना रणौतने शेतकरी आंदोलनाबाबत भाष्य करताना ट्विटरवर म्हटलं होतं की, शाहिन बागच्या दादीने देखील शेतकऱ्यांच्या या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. कौर यांचा फोटो ट्विट करत तिने म्हटलं होतं की ही तिच दादी आहे जी 100 रुपयांसाठी कोणत्याही आंदोलनात उपलब्ध राहते. त्यानंतर या दोन्हीही महिला वेगळ्या आहेत हे समजल्यानंतर कंगनाने ते ट्विट डिलीट केलं होतं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’
Discussion about this post