हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचा खेळ सुरु होऊन आता ८० दिवसांचा टप्पा उलटतोय. या घरातील सदस्यांनी जीव लावून हा खेळ खेळला. कधी भावना राखून तर भावना शून्य होऊन प्रत्येकाने आपले १००% दिले आहेत. दिवसेंदिवस हा खेळ अत्यंत रंजक होत चालला आहे. आतापर्यंतच्या भागात आपण घरातील सदस्यांना रोज राडा, भांडण, बाचाबाची, हाणामारी असं बरंच काही करताना पाहिलं. पण या आठवड्यात उरलेले सदस्य अक्षरशः ओक्साबोक्शी रडताना दिसणार आहेत. कारण बिग बॉस मराठीचा फॅमिली वीक सुरु झाला आहे.
बिग बॉसच्या घरात एंटर करणारा स्पर्धक घराबाहेर त्याची नाती, त्याची माणसं असं बरंच काही सोडून फक्त आठवणी घेऊन आलेला असतो. त्यामुळे पहिल्या दिवसापासून ८० दिवसांचा टप्पा गाठणारा स्पर्धक कित्येकदा घरच्यांच्या आठवणीत कुठेतरी कोपऱ्यात आसवं गाळताना दिसतो. कुटुंबापासून लांब स्वतःला सिद्ध करताना मनाच्या कोपऱ्यातले त्यांचे स्थान नेहमी भावनांना आवरत असते. पण जेव्हा या घरात सदस्यांना त्यांचे कुटुंबीय भेटायला येतात तेव्हा मात्र या भावनांचा बांध फुटतो आणि आपसूकच डोळे वाहू लागतात.
या आठवड्याची वाट तर प्रत्येक स्पर्धक पाहत असतो. बऱ्याचदा स्पर्धक आणि पालकांमध्ये असलेले वाद देखील या निमित्ताने समोर येतात आणि यामुळे स्पर्धक आणखीच हळवे होतात. शेवटी तो वीक आलाच जेव्हा हे स्पर्धक त्यांच्या जवळच्या माणसांना भेटणार आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये स्पर्धक अमृता धोंगडेचे आई बाबा तिला भेटायला आल्याचे आपण पाहू शकतो. यावेळी अमृता अगदी लहान मुलांसारखी रडू लागते. तर अपूर्वाची आई तिच्या भेटीला येते. शिवाय किरण माने यांची पत्नीदेखील त्यांच्या भेटीसाठी घरात दाखल होणार आहेत. घरातील स्पर्धकांसाठी हा आठवडा थोडा भावनिक पण खूप ताकद देणारा ठरणार आहे.
Discussion about this post