हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हिंदी सिनेसृष्टीतील अत्यंत मानाचा आणि मोठा मानला जाणारा पुरस्कार म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार. नुकताच यंदाचा फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला असून यासाठी अष्टपैलू ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सिनेसृष्टीतील बहुमूल्य योगदानासाठी आशा पारेख यांना हा मानाचा पुरस्कार दिला जाणार आहे. हि घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात आशा पारेख यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
Asha Parekh to be conferred with Dadasaheb Phalke Award, investiture on Friday
Read @ANI Story | https://t.co/cbRGvyJHbw#AshaParekh #DadasahebPhalkeAward pic.twitter.com/i4wLly0oDl
— ANI Digital (@ani_digital) September 27, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. लवकरच होणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना हा पुरस्कार दिला जाईल. येत्या ३० सप्टेंबर २०२२ रोजी दिल्लीमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. मुख्य म्हणजे, देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अभिनेत्री आशा पारेख यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अनुराग ठाकूर या क्षणी म्हणाले कि, ‘अभिनेत्री आशा पारेख यांची या पुरस्कारासाठी निवड झाली ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.’
बॉलिवूड सिने इंडस्ट्री गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सिने इंडस्ट्रीला वाहिले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी ७५ हून अधिक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका केल्या आहेत. दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या ‘माँ’ या चित्रपटात एक बालकलाकार म्हणून आशा पारेख यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये बेबी आशा पारेख म्हणून काम केले. पुढे १९५९ मध्ये नासिर हुसैन दिग्दर्शित ‘दिल देके देखो’ या चित्रपटातून त्यांनी अभिनेत्री म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटात त्यांनी सुपरस्टार शम्मी कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपट तुफान गाजला होता.
आतापर्यंत अभिनेत्री आशा पारेख यांना मनोरंजन क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. साल १९९२ मध्ये भारत सरकारने त्यांना प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. यांनतर आशा यांनी १९९८ ते २००१ या काळात सेन्सॉर बोर्ड अध्यक्ष पद भूषविले. ‘जब प्यार किसीसे होता है’, ‘तिसरी मंजिल’, ‘कटी पतंग’, ‘बहारों के सपने’, ‘फिर वही दिल लाया हूँ’, ‘कारवाँ’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका केल्या आहेत. एक उत्तम अभिनेत्री, उत्कृष्ट नृत्यांगना, आघाडीची दिग्दर्शिका आणि निर्मात्या म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
Discussion about this post