हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट सह्याद्रीचा सिंह.. जना मनातला आवाज.. आणि मातीतला अस्सल लोककलावंत स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे संगीताची एक अनोखी पर्वणी आहे.
या चित्रपटातील जी गाणी रिलीज झाली आहेत ती लोकप्रिय ठरताना दिसत आहेत. यातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणे चित्रपटातील प्रेमगीत आहे. ज्याची भुरळ आता परदेशीयांनाही पडली आहे.
सोशल मीडियावर रिकी पौंड या परदेशी रील स्टारने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील अतिशय लोकप्रिय ठरलेल्या ‘बहरला हा मधुमास’ गाण्याच्या हुक स्टेप्स केल्या आहेत. त्याने तंतोतंत या डान्स स्टेप फॉलो करून नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे. या परदेशी रील स्टारचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. या आधी अनेक मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू गाण्यांवर त्याने रिल्स बनवून शेअर केल्या आहेत. यातील त्याचे ‘नाटु नाटु’, ‘रघुपती राघव राजाराम’, ‘रावडी बेबी’, ‘सनक’ या गाण्यांवरील रील तुफान व्हायरल होत आहेत.
‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्स यांची आहे. तर चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे हे आहेत. या चित्रपटाला अजय आणि अतुल या महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीचे मंत्रमुग्ध करणारे संगीत लाभले आहे. याशिवाय चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ हा बहुचर्चित चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. तूर्तास चित्रपटातील गाणी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यास यशस्वी झाली आहेत.
Discussion about this post