हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी रंगभूमी, छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यावरही विविध भूमिका वठवून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करणारे अभिनेते प्रशांत दामले यांच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. नुकतेच काल रविवार, ६ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांनी आपल्या विक्रमी नाटकाचे १२ हजार ५०० प्रयोग पूर्ण केले. हि बाब मनोरंजन विश्वासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह, मुंबई या ठिकाणी दामलेंच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा हा विक्रमी असा १२ हजार ५०० वा प्रयोग झाला. मुख्य म्हणजे, ६ नोव्हेंबर ‘मराठी रंगभूमी दिन’ हे औचित्य साधून हा प्रयोग केला गेला.
या प्रयोगाला अनेक दिग्गजांसह, राजकीय मान्यवरांनीही हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या प्रयोगासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. इतकेच नव्हे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील या प्रयोगाला उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी मोठी घोषणा केली.
आपल्या नाटकाचे विक्रमी प्रयोग १२ हजार ५०० प्रयोग पूर्तीनिमित्त प्रशांत दामले यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रशांत दामले यांना पद्म पुरस्कार देण्याचा प्रस्ताव केंद्राला दिला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना सांगितले. ते म्हणाले कि, ‘१२ हजार ५०० प्रयोग प्रशांत दामले यांनी केले, ही राज्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. त्यामुळे प्रशांत दामले यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी करणारा प्रस्ताव आम्ही केंद्र सरकारला पाठवला आहे.’
त्यामुळे येत्या काळात अभिनेते प्रशांत दामले पद्म पुरस्कार विजेते अभिनेते म्हणून ओळखले जातील, अशी शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी नाट्यसृष्टीच्या विविध अडचणी आणि मार्गी न लागलेल्या प्रश्नांवर लक्ष वेधले. त्यांनी सांगितले कि, ‘लवकरच राज्यातील सर्व नाट्यगृहे हि सुस्थितीत असतील. अशी ग्वाही देऊन त्यांनी सांगितले कि, मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे.’ आशा आहे कि, येत्या काळात रंगभूमीला एक वेगळे तेज आणि वेगळी गरिमा प्रधान करण्यात आली असेल.
Discussion about this post