हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच सोशल मीडियावर लावणीच्या नावावर अश्लील चाळे करण्यासाठी चर्चेत आलेली गौतमी पाटील बघता बघता चांगलीच प्रसिद्धीची शिखरं चढतेय. लोकांना तिच्या अदांची अशी काही भुरळ पडली आहे कि, तिच्या कार्यक्रमाला लोक लांब लांबचा पल्ला गाठून येतात.
अलीकडेच गौतमीने मिरज तालुक्यातील बेडग गावात लावणीचा कार्यक्रम केला होता. यावेळी प्रेक्षकांनी अक्षरशः हैदोस घातला. लोकांना मैदानात बसायला जागासुद्धा नव्हती. या राड्यात शाळेची कौल फुटली, कित्येक झाडं तुटली आणि कहर म्हणजे एका माणसाचा जीवसुद्धा गेला.
गौतमीच्या अदा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली. यावेळी मैदान इतकं कचाकच भरलं होत कि कुणाला धड बसायला जागाच नव्हती. म्हणून काही लोक थेट शाळेच्या छतावर चढले. या गर्दीच्या वजनाने शाळेची कौलं एकामागे एक धडाधड फुटली. इतकंच काय तर शाळेतील कंपाऊंडचंदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
याशिवाय काही प्रेक्षक लावणी पाहायला उंच उंच झाडावर चढले होते. यामध्ये अनेक झाडंही मोडली. त्यामुळे वाद पेटला. दरम्यान या प्रकारानंतर या परिसरात एक मृतदेह आढळून आला आणि मोठी खळबळ उडाली. त्यानंतर बुधवारी गौतमीने पत्रकार परिषद घेवून झालेल्या प्रकाराशी आपला संबंध नाही असे सांगितले.
गौतमी म्हणाली कि, ‘मी कोल्हापूरची नाही. तर धुळ्याची आहे. लोकं माझ्या बाबत अफवा पसरवत आहेत. शिंदखेडा हे माझं मूळ गाव आहे. माझ्या जन्मानंतर माझ्या वडिलांनी मला आणि आईला सोडलं. घरची परिस्थिती चांगली नव्हती म्हणून मी आधी बॅक स्टेज डान्सर म्हणून काम केले. त्यानंतर मी लावणीकडे वळाले.
एका कार्यक्रमात माझ्या कडून जी चूक झाली होती ती मी मान्य केली. डान्सच्या फ्लोमध्ये झालेल्या चुकांमुळे मी सगळ्यांची माफी मागते. त्या व्हिडिओ नंतर मी माझ्या डान्समध्ये बदल केले आहेत. सांगलीच्या गोष्टीवरून मला वाईट वाटले. मी माझं काम केले पण मला अशी काही गोष्ट होईल याची कल्पना नव्हती. ते वयस्कर होते आणि त्यांच्या मृत्यूने मलाही वाईट वाटलं आहे. शो संपल्यावर मला कळलं की तिथल्या एका माणसाचा मृत्यू झाला.’
Discussion about this post