हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि प्रसाद ओक अभिनित ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट शिवसेना नेते आणि ठाण्याचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेले आनंदराव दिघे यांच्या जीवनावर आधारित आहे. फर्स्ट लुकपासून सर्वत्र या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. अशातच आता ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा जळजळीत ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर अवघ्या काही मिनिटांत दिघेंची अशी काही झलक दाखवतोय कि पुन्हा एकदा आनंद दिघे यांची संगत अनुभवायला मिळेल अशी शिवसैनिकांना आशा वाटते आहे.
अगदी दोन मिनिट दोन सेकंदांचा हा ट्रेलर आहे. पण या दोन मिनिटांत प्रेक्षकांची नजर इकडची तिकडे होणार नाही याची खात्री आहे. चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवातच ‘यतो धर्मा:स्ततो जया’ या महाभारतातील वाणीने होते. ‘जिथे धर्म तिथे विजय’ असा या वाक्याचा अर्थ आहे. आनंदराव दिघे यांची ओळखच मुळात धर्मवीर अशी आहे. धर्माला राखून आणि पूर्ण विचारानिशी त्यांनी आपले संपूर्ण जीवन लोकांसाठी बहाल केले. आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेल्या आणि दोन्ही खिसे रिकामे असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसाचा पाठिंबा ! आनंद दिघे आज लौकिक अर्थाने हयात नसले तरी सर्वसामान्यांच्या मनात ते आजही जिवंत आहेत.
या ट्रेलरमध्ये आपण पाहू शकता कि, ठाण्यात दिघेंचा दरबार भरायचा असे म्हटले गेले आहे. या दरबारात विजय सत्याचा व्हायचा कारण हे कोर्ट स्वतः पुराव्यांपर्यंत जायचं अशाही आशयाचे काही डायलॉग यात पहायला मिळतील. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक याने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेत प्रसाद अतिशय लक्षवेधी आणि मुख्य म्हणजे हुबेहूब दिघेंची छबी दिसतोय. गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या चित्रपटाच्या ट्रेलरचे लाँचिंग केले होते. यावेळी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटीसुद्धा हजर होते. यामध्ये सलमान खान विशेष आकर्षण होता. प्रविण तरडे दिग्दर्शित, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओज निर्मित ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट येत्या १३ मे २०२२ रोजी झी स्टुडिओजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येतोय.
Discussion about this post