हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बबन’, ‘ख्वाडा’ सारखे दर्जेदार चित्रपट देणारे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा ‘TDM’ हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी चित्रपटाला चांगला प्रतिसाद देऊनही राज्यात बऱ्याच ठिकाणी ‘TDM’चे शो कॅन्सल केले गेले.
पुढे चित्रपटाला थिएटरमध्ये शो न मिळाल्याने दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंनी TDM चे प्रदर्शन थांबवले. दरम्यान ठिकठिकाणी प्रेक्षकांनी TDM चित्रपट, त्यातील कलाकार आणि दिग्दर्शकाला पाठिंबा दिल्याचे दिसले. प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंबा पाहून आता TDM पुन्हा एकदा थिएटर गाजवण्यासाठी येत असल्याचे सांगत भाऊरावांनी नव्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.
या संदर्भात भाऊराव कऱ्हाडे म्हणाले कि, ‘नमस्कार रसिक प्रेक्षकहो, #ISupportTDM मोहीम उत्स्फुर्तपणे राबवून आपण सर्वांनी जो काही प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आपल्या या खंबीर पाठिंब्यामुळे आम्हाला एक नवी उमेद मिळाली आहे आणि याच उमेदीने आम्ही ‘टीडीएम’ चित्रपट पुन्हा प्रदर्शनासाठी सज्ज झालो आहोत… टीडीएम’ च्या प्रवासाला पुन्हा सुरवात होत आहे … ९ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘#टीडीएम’ प्रदर्शित होत आहे. आपल्या सर्वांचे उदंड प्रेम मिळेल याची खात्री आहे… तेव्हा भेटूया थेटरात… ९ जून ला…’
TDM चित्रपटाचे प्रदर्शन थांबवतेवेळी चित्रपटाची संपूर्ण टीम भावुक झाल्याचे दिसले होते. भाऊराव म्हणाले होते कि, ‘हा सिनेमा बंद पडला तर फाशी घेण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय नाही. मी ३.५ कोटींचं कर्ज घेऊन हा सिनेमा केला आहे. बऱ्याच बँकांचं कर्ज आहे माझ्यावर, मी सगळी माहिती देतो. माझ्या घरातून पैसे टाकून हा सिनेमा केलेला नाही, एक एक रुपया जोडून आम्ही यासाठी मेहनत घेतली आहे. अशी जर गळचेपी होत असेल तर हा एकप्रकारे कलाकारांचा खून आहे’. शिवाय इतर चित्रपटांना १५० तर ‘TDM’ला केवळ २० शो दिल्याचेही त्यांनी सांगितले होते.
Discussion about this post