हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या शुक्रवारी राज्यभरात ‘TDM’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, गावगाड्यातील सहज सुंदर प्रेमकहाणी आणि मनोरंजक ट्वीट्सने परिपूर्ण असणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला खरा.. पण या चित्रपटाला शो काही मिळेनात. ज्यामुळे दिग्दर्शक आणि कलाकारांसह चित्रपटाच्या संपूर्ण टीमला वेगळ्याच मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. हि परिस्थिती पाहून अखेर दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. एकंदर परिस्थिती पाहून ‘TDM’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवून कऱ्हाडेंनी सगळ्यांनाच मोठा धक्का दिला आहे.
प्रेक्षकांना ‘TDM’ पाहण्याची इच्छा असतानाही या चित्रपटाला थिएटरमध्ये पुरेशा प्रमाणात स्क्रिन न मिळाल्याने त्यांची निराशा झाल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रिन उपलब्ध नाही याची खंत निर्माते आणि दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी व्यक्त केली. डोळ्यात पाणी आणि हात जोडलेले अशा अवस्थेत त्यांनी भावनिक साद घातली. मात्र तरीही परिस्थितीत काहीच बदल झाला नाही. त्यामुळे शेवटी आज सकाळी ११ वाजता अधिकृत फेसबुक हॅण्डलवर लाईव्ह येत त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला.
या फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून भाऊराव यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत सांगितले कि, आपण ‘TDM’चे शो मागे घेत आहोत. दरम्यान मेकर्सच्या वतीने एक प्रसिद्धीपत्रकदेखील जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘रसिक प्रेक्षकहो नमस्कार!! मला माहिती आहे तुम्हाला ‘टीडीएम’ सिनेमा थिएटरमध्ये बघायची इच्छा आहे.
पण सध्याची परिस्थिती बघता मी ‘टीडीएम’चे प्रदर्शन तूर्तास थांबवत आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पुढील प्रदर्शनाचे अपडेट्स लवकरात लवकर देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तुम्ही करत असलेल्या सहकार्यासाठी सर्वांचे मन:पूर्वक आभार!’
Discussion about this post