हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मागील दहा दिवसांत ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने चर्चेची बरीच स्पेस व्यापली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक असुदे किंवा भाजपशासित राज्यांमधील सरकारने हा चित्रपट टॅक्सफ्री करणं असुदे किंवा याऊलट प्रतिक्रिया म्हणून तामिळनाडू, पश्चिम बंगाल सरकारने या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याची कृती असुदेत, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे हा चित्रपट चर्चेत राहिलाय आणि ट्रेंडिंगलासुद्धा. स्थानिक राजकारणीसुद्धा आसपासच्या महिलांना हा चित्रपट मोफत दाखवू लागली आहेत. केरळमध्ये काय घडतंय बघा हे दाखवण्याची आणि त्यायोगे देशाला हानिकारक असलेल्या गोष्टींपासून लांब राहण्याची शाळाच हे सगळे लोक घेतायत.
मुळात हा चित्रपट बघावा का? तर हो, बघायला हवा. का? तर दिग्दर्शकाला खूप सारी मेहनत घेऊन लोकांना काहीतरी दाखवायचं होतं, हे दाखवून लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या होत्या आणि अर्थातच पैसेही कमवायचे होते. पण हे सगळं करताना दिग्दर्शक किती प्रामाणिक राहिलाय? त्याने मांडलेली माहिती, कोर्टासमोर सादर केलेलं प्रतिज्ञापत्र आणि एकूण वास्तव पाहता ही कलाकृती ‘खोटं बोल पण रेटून बोल’ हे सिद्ध करणारी ठरली आहे.
फाळणी झाल्यापासून भारत देशात मुस्लिमांविषयी द्वेष असणारा एक गट कायम सक्रिय राहिलाय. मुस्लिमांसाठी हा देश परका आहे, त्यांनी इथं राहून माज करू नये, सगळे मुस्लिम देशद्रोही असतात, मुस्लिमांना विचारात न घेतासुद्धा आम्ही निवडणूका जिंकू शकतो, मुस्लिम मुलं हिंदू मुलींना फसवून त्यांचं नुकसान करतात, मुस्लिमांनी स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अधिकाधिक मुलं जन्माला घातली आहेत या आणि अशा कित्येक गोष्टी बोलून आपल्या देशातील मुस्लिम बांधवांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं. वारंवार देशभक्ती सिद्ध करायला लावली जाते. हे फक्त सामान्य मुस्लिम नाही तर अगदी उच्चपदस्थ व्यक्ती, सिनेकलाकार, प्रशासकीय अधिकारी यांच्याबाबतीतही हेच लागू आहे. देशातील हिंदू बांधवांमध्ये मुस्लिमांविषयी कायम असुरक्षिततेचं वातावरण निर्माण करणारा जो गट आहे, जी लोकं आहेत तीच या चित्रपटाचं भरभरून प्रमोशन करत आहेत.
केरळमधील हिंदू, ख्रिश्चन मुलींना मुस्लिम मुलांकडून फुस लावून त्यांना जबरदस्तीने धर्मांतर करायला लावलं जातं, आणि त्यानंतर त्यांना आयसिसच्या (ISIS) दहशतवादी कारवायांत सहभागी केलं जातं, किंवा सेक्ससाठी त्यांचा गुलाम म्हणून वापर केला जातो हे दाखवणं ही चित्रपटाची मूळ कल्पना आहे. या कामासाठी केरळमध्ये मोठं नेटवर्क काम करत असल्याचा दावा चित्रपट करतो. शिवाय हजारो कॉलेजवयीन मुली मागील काही वर्षांमध्ये अशाच प्रकारात गायब झाल्याची बतावणीही चित्रपटात आहे.
तुम्ही ज्यावेळी मुस्लिम लोकं वाईटच असतात, त्यांच्यापासून दूरच राहिलं पाहिजे असा विचार करून फुकटच्या किंवा स्वखर्चाच्या तिकीटाने थिएटरमध्ये शिरता, त्यावेळी तुम्हाला खूप राग येत राहतो, चीड येते. मुस्लिमांना धडा शिकवायला पाहिजे, देश लवकर हिंदूराष्ट्र करायला पाहिजे अशा भावनाही थिएटरमधून बाहेर पडताना तुमच्या मनात येतात. थिएटर हाऊसफुल आहे म्हणजे चित्रपट खोटा नाही असंही बऱ्याच जणांना वाटतं. मात्र २-३ सोपे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले की चित्रपटाच्या हेतूविषयी आणि त्याच्या सत्यतेविषयी तुम्हाला सगळं काही समजायला मदत होते.
१) केरळमधील हजारो मुली धर्मांतरित होत असताना किंवा दहशतवादी कारवायांत सहभागी होत असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत होतं? आणि मुलींचे पालकसुद्धा याविषयी तक्रार का करत नव्हते? आता मोफत तिकीट वाटणाऱ्या भाजप पक्षाचे केरळमधील लोक तेव्हा काय करत होते?
२) चित्रपटाच्या दिग्दर्शकाने फसवणूक झालेल्या मुलींचा आकडा ३२,००० नाही तर ३ आहे असं का सांगितलं?
३) तुम्हाला मुस्लिम मित्र-मैत्रिण आहेत का? त्यांच्याशी तुमची वैचारिक देवाण-घेवाण आहे का? तुमच्या इच्छेविरुद्ध ते तुम्हाला एखादी कृती करायला लावतात का?
४) एखाद्या समाजाविषयी, त्यातल्या लोकांविषयी पुरेसं समजून घेण्यासाठी आपण वेळ देणार का?
या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. शोषण मग ते हिंदू धर्मात असो मुस्लिम धर्मात किंवा इतर कोणत्याही ते वाईटच. त्यासाठीचा विरोध हा व्हायलाच हवा. मात्र विशिष्ट हेतू ठेवून एखाद्या समाजाची, राज्याची किंवा यंत्रणेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात नाही ना? हा भान ठेवणारा प्रश्नही प्रेक्षकांनी स्वतःला विचारायचा आहे. केरळ राज्याची देशातील एकूण प्रतिमा ही आरोग्य, शिक्षण, साक्षरता या विषयात अग्रेसर काम करणारं राज्य म्हणून आहे.
राज्याची प्रतिमा मलिन करण्याचा भाग असलेला हा चित्रपट बंद पाडण्याचा विचारही तिथल्या सरकारने केला नाही. लोकांना चित्रपट पाहूदे आणि शक्य झाल्यास इथं येऊन वास्तवही पाहुदेत अशीच भूमिका सत्ताधारी मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळं सुजाण नागरिकांनी हा चित्रपट जरूर पहावा, मात्र त्याची सत्य-सत्यता पडताळणी करूनच..!
Discussion about this post